मौलानाच्या पुढच्या पिढ्या दंगलीचा विचारही करणार नाहीत - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

    27-Sep-2025   
Total Views |


नवी दिल्ली,  उत्तर प्रदेशात सध्या कोणाचे सरकार आहे, याचा मौलानास विसर पडला आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्या पुन्हा दंगल घडविण्याची हिंमत करणार नाहीत; असा धडा शिकवण्यात येईल, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौलाना तौकीर रझावर शनिवारी केली आहे.

उत्तर प्रदेशात बरेली येथे झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, सण आणि उत्सवांच्या काळात हिंसाचार घडविण्याची सवय काही दंगेखोरांना लागली होती. अनेकदा वाईट सवयी लवकर जात नाहीत, त्यामुळे बरेलीमध्ये मौलानाने जे काही घडविले ते त्याचाच भाग होता. मात्र, राज्यात आता कोणाचे सरकार आहे याचा विसर मौलानास पडला. धमकी देऊन शहरात राडेबाजी करण्याचा त्याचा मनसुबा होता. आमच्या सरकारने मात्र कर्फ्यू न लावताही असा धडा शिकवला की त्याच्या पुढच्या पिढ्याही आता दंगली घडवण्याचा विचार करणार नाही.

हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा यास अटक केली आहे. बरेली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांशी झटापट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेसंदर्भात दहा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि मौलाना तौकीर रझा याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मौलानास १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

बरेली हिंसाचाराबद्दल जिल्हाधिकारी अविनाश सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी ३९ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की हे कट गेल्या सात दिवसांपासून सुरू होते आणि त्यात बाहेरील लोकही सामील होते. पोलिसांनी या प्रकरणात १० एफआयआर नोंदवले आहेत, त्यापैकी सातमध्ये मौलानाचे नाव आहे. दरम्यान, एसएसपी अनुराग आर्य यांनी खुलासा केला की हे कट गेल्या सात दिवसांपासून सुरू होते. चाकू, पिस्तूल, ब्लेड आणि पेट्रोलच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.