लेहमधील हिंसाचारास सोनम वांगचूक हेच जबाबदार : पाक कनेक्शन ते परकीय निधीची होणार चौकशी – लडाख पोलिस

    27-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  लडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एस. डी. सिंग जामवाल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगून, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरले.

डीजीपी जामवाल म्हणाले, अलीकडेच लडाख पोलिसांनी पाकिस्तानी पीआयओला अटक केली आहे. तो सातत्याने पाकिस्तानला माहिती पोहोचवत होता आणि त्याचा संपर्क सोनम वांगचुक यांच्याशी होता. आमच्याकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत. वांगचुक यांनी पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यांनी बांगलादेशालाही भेट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

जामवाल यांनी आरोप केला की, २४ सप्टेंबर रोजी लेह येथे झालेल्या हिंसाचारात वांगचुक यांनी लोकांना भडकावण्याचे काम केले. सोनम वांगचुक यांचा पूर्वेइतिहास अशा प्रकारचा आहे. त्यांनी पूर्वीही अरब स्प्रिंग, नेपाळ आणि बांगलादेश यांचे उदाहरण देत जनतेला भडकवले आहे. यावेळी देखील त्यांनी उत्तेजक भाषण केले. त्यांच्या निधीबाबत परकीय योगदान नियमांचे (एफसीआरए) उल्लंघन झाले आहे का, याचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जामवाल म्हणाले, लेह हिंसाचारामागे काही परकीय सहभाग आहे का, हे तपासले जात आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी दोन जणांना पकडले आहे. ते एखाद्या नियोजित कारस्थानाचा भाग आहेत का, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या प्रदेशात ऐतिहासिकदृष्ट्या नेपाळमधून आलेले मजूर काम करतात. त्यामुळे याबाबतही चौकशी आवश्यक आहे.

डीजीपींनी स्पष्ट केले की, काही तथाकथित पर्यावरण कार्यकर्त्यांनी लोकांना चिथावणीखोर भाषणे दिली ज्यामुळे हिंसाचार उसळला. २४ सप्टेंबरच्या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तसेच मोठ्या संख्येने नागरीक, पोलीस अधिकारी आणि अर्धसैनिक दलाचे जवान जखमी झाले. या घटनेमागे सुरू असलेल्या केंद्र सरकारसोबतच्या चर्चेला बिघडवण्याचा प्रयत्न दिसून येतो. या प्रक्रियेवर पाणी फेरण्याचा कट काही कार्यकर्त्यांनी रचला. यामध्ये सर्वात ठळक नाव म्हणजे सोनम वांगचुक यांचे आहे. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची विधाने करून संवाद प्रक्रियेला अडथळा आणण्याचे काम केले आहे, असे जामवाल म्हणाले.