नवी दिल्ली : दूरसंचार पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दि. २७ सप्टेंबर रोजी ओडिशातून बीएसएनएलच्या 'स्वदेशी' 4जी स्टॅकचे उद्घाटन केले. यामुळे भारताचा समावेश दूरसंचार उपकरणे तयार करणाऱ्या राष्ट्रांच्या प्रतिष्ठित गटात झाला आहे.'भारत संचार निगम लिमिटेड'च्या रौप्य महोत्सवानिमित्त, पंतप्रधानांनी ९७,५०० हून अधिक मोबाइल 4जी टॉवर्सचे उद्घाटन केले आहे. हे टॉवर्स 'स्वदेशी' तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे ३७,००० कोटी रुपये खर्च करून बांधले गेले आहेत.
सोबतच, पुण्यातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फर्सच्या माध्यमातून व्हर्च्युअली या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. दरम्यान कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, "पुढील दोन महिन्यांत नागरिकांसाठी ९० टक्के सरकारी सेवा डिजिटल होतील आणि लवकरच त्या व्हॉट्सअॅपद्वारे देखील वापरता येतील".
शिवाय, "हा केवळ अभिमानाचा क्षण नाही तर औद्योगिक क्रांतीनंतरच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. बीएसएनएलच्या स्वदेशी तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात ही भारताच्या स्वावलंबी, सक्षम आणि बलवान होण्याच्या प्रवासात एक मोठे पाऊल आहे," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
'स्वदेशी' 4जी नेटवर्कचा फायदा काय?
१) या नेटवर्कमुळे ओडिशातील २,४७२ गावांसह, दुर्गम, सीमावर्ती आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित भागातील २६,७०० हून अधिक गावांना कनेक्शन मिळेल.
२) हे नेटवर्क २० लाखाहून अधिक नवीन ग्राहकांना सेवा देईल.
३) हे टॉवर सौरऊर्जेवर चालणारे आहेत, ज्यामुळे ते भारत ग्रीन टेलिकॉम साइट्सचे सर्वात मोठे क्लस्टर बनले आहे.
४) याशिवाय, पंतप्रधानांनी डिजिटल भारत निधीद्वारे भारताच्या १००% 4जी सॅच्युरेशन नेटवर्कचे अनावरण केले आहे, जिथे २९,००० ते ३०,००० गावे मिशन-मोड प्रकल्पात जोडली जातात.
५) बीएसएनएल टॉवर्स ओडिशा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात आणि बिहारमध्ये पसरलेले आहेत.त्यामुळे या नेटवर्कचा या राज्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.