पुणे, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची १०७वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बोलताना आ. दरेकर यांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीने देशाला दिशा दिली. आज दुर्दैवाने दशा होतेय ही वस्तुस्थिती असून योग्य नियोजन केले तर या सर्व व्यवस्था बदलू शकतो. सहकारी संस्था, जिल्हा बोर्ड आणि राज्य संघांनी आपले हे सहकाराचे झाड फुलले, फळले पाहिजे या दृष्टीने येणाऱ्या काळात हातात हात घालून एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, संचालक संजीव कुसाळकर, प्रकाश दरेकर, नंदकुमार काटकर, अशोक जगताप, सुनील जाधव-पाटील, हिरामण सातकर, विलास महाजन, रामकृष्ण बांगर, धनंजय कदम (शेडगे), गुलाबराव मगर, अनिल गजरे, संजय पाटील, नितीन बनकर, अरुण पानसरे, प्रमोद पिंपरे, विष्णू घुमरे, संचालिका जयश्री पांचाळ, दिपश्री नलवडे, तज्ज्ञ संचालक शिवाजीराव नलावडे, मुकुंद पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकूर यांसह मोठ्या संख्येने सभासद, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, १०६ वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत संघाची स्थापना झाली. या संघाला वैभव, महत्व होते. दुर्दैवाने ते महत्व कमी झाले. प्रतिकूल परिस्थितीतही सुवर्णकाळ जपता आला नसेल परंतु अधिकारी, प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी संघाचे अस्तित्व ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संघाचा स्रोत वाढविण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहे. सहकारातील कार्यकर्त्यांनी धीर धरण्याची गरज असून सरकारकडे काय मागायचे ते शंभर टक्के मागू. प्राप्त परिस्थितीत जे काही मिळवण्यासारखे आहे ते मिळवू. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून नवरात्री नंतरच्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य सहकारी संघासंदर्भात बैठक घेणार आहोत. त्यात आपले विषय मार्गी लावू, असेही दरेकर यांनी आश्वस्त केले.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले कि, राज्य सहकारी संघा मार्फत दर्जेदार, खरे प्रशिक्षण दिले पाहिजे. आपण प्रमाणपत्र आवश्यक म्हणून देतो परंतु त्याचे नीट मार्गदर्शन झालेले नसते. एक वर्ष त्या प्रमाणपत्राचा उपयोग होतो. भविष्यकाळात ती संस्था अडचणीत येते म्हणून दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा मानस राज्य सहकारी संघाचा आहे. सुवर्णकाळ आला पाहिजे हे केवळ बोलून चालणार नाही तर तो येण्यासाठी आपल्याला खारीचा वाटा उचलला पाहिजे ही भूमिका घेऊन सहकारात काम केले तर येणारी शंभर वर्ष महाराष्ट्रातील सहकाराला कुणी धक्का लावू शकणार नसल्याचाही दृढ विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
मी ज्या संस्थेचे नेतृत्व करतो, ती जबाबदारी पार पाडत ती संस्था प्रगतीकडे नेतो. मुंबई बँकेत आलो तेव्हा ती बाराशे कोटींची होती आज जिल्हा बँक १५ हजार ७०० कोटींवर नेली आहे. अनेक आरोप, टीका सहन केली. पण कशाचीही तमा केली नाही. जेव्हा आपला उद्देश स्वच्छ असतो तेव्हा लोकं आपल्यासोबत राहतात. गृहनिर्माणसाठी स्वयं पुनर्विकास योजना आणली. जिल्हा बँकेने या योजनेसाठी पैसे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिला. सभासदांचे हित लक्षात घेऊन १८ पैकी १६ मागण्या मुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून मान्य केल्या. १६०० प्रस्ताव आमच्याकडे आले असून ४०-४५ संस्थांना कर्ज दिले आहे. आज मुंबईत स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून १८ इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही क्रांती एक सहकारी बँक करू शकते, असेही दरेकर म्हणाले.
संचालक मंडळाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी गरजेची
आ.दरेकर म्हणाले कि, संघाच्या हितासाठी आम्ही संचालक मंडळ जे काही सांगू, निर्णय घेऊ त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होण्याची गरज आहे. राज्य सहकारी संघाला पुन्हा गतवैभव आणण्यासाठी या संचालक मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सुदैवाने आपले सरकार आहे. सहकाराच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या निश्चित सोडवून घेऊ शकतो. ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी योजना माझ्या डोक्यात आहे. शेतकऱ्याला दलाल वेठीस धरतात. त्यांचा माल अल्पदरात घेतात. जर शेतकऱ्याला थेट पैसे उपलब्ध करून दिले तर तो दलालाकडे कशाला जाईल. त्याला वेळेत पैसे देणे, त्याचा माल मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरात आणून ग्राहक सहकारी संस्थांची डिपार्टमेंटल स्टोअर आहेत त्यांच्याकडेविकला तर शेतकऱ्याची आर्थिक ताकद मजबूत होते. तशा प्रकारचे अभियान येणाऱ्या काळात चालवायचे आहे. एकटा माणूस हे करू शकणार नाही. शेकडो लोकांनी एकेक जबाबदारी उचलली तर सहकाराच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याची क्षमता राज्याच्या सहकार चळवळीत आहे, असेही दरेकर म्हणाले.