दंतेवाडामध्ये ७१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    24-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली, छत्तीसगढमध्ये नक्षलविरोधी मोहिमेंतर्गत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या कारवाईत ठार होण्याच्या भीतीने नक्षलवादी संघटनांमध्ये सक्रिय असलेले तब्बल ७१ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले. यामध्ये ५० पुरुष आणि २१ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आत्मसमर्पण करणाऱ्यांपैकी ३० नक्षलवाद्यांवर मिळून ६४ लाख रुपयांचे इनाम जाहीर होते.

दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, सर्व नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर अधिकृतपणे आत्मसमर्पण केले आहे. बस्तर विभागात सुरू असलेल्या सरेंडर आणि पुनर्वसन धोरणामुळे तसेच ‘पूना मारगेम’ (पुनर्वसनातून पुनर्जन्म) आणि ‘लोन वर्राटू’ (घरी परत या) अभियानामुळे हे नक्षलवादी प्रभावित झाले होते. त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी. म्हणाले की, सध्या नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. पोलिस आणि फोर्सच्या कारवाईमुळे नक्षलवादी संघटनांमध्ये दहशत पसरली आहे.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक कुख्यात व इनामी नक्षलवादी आहेत. बामन मडकाम याच्यावर आठ लाख रुपयांचे इनाम जाहीर होते. तो २०११ मधील ग्राम दमपाया, २०१२ मधील मटलाचेरू, २०१४ मधील दुगईगुडा, २०२१ मधील अम्बेली, २०२२ मधील वेलगाडरम आणि २०२४ मधील गुण्डम जंगलातील पोलिस-नक्षल चकमकीत सामील होता. शमिला उर्फ सोमली कवासी हिच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम होते. सरकारी संपत्तीचे नुकसान, मोबाईल टॉवर जाळणे आणि २०२४ मधील बोड़गा गावातील पोलिस-नक्षल चकमकीत ती सामील होती. गंगी उर्फ रोहिणी बारसे हिच्यावरही पाच लाखांचे इनाम होते. ती २०२४ मध्ये भामरागड एरिया कमिटीच्या परादी गावातील पोलिस-नक्षल चकमकीत सहभागी झाली होती. देवे उर्फ कविता माडवी हिच्यावरही पाच लाख रुपयांचे इनाम होते. ती २०२४ मध्ये दक्षिण बस्तर डिव्हिजनच्या झीरम गावातील पोलिस-नक्षल चकमकीत सामील होती. जोगा मडकाम याच्यावर दोन लाख रुपयांचे इनाम होते. तो २०१८ मध्ये मार्जूम गाव आणि २०२१ मध्ये गोगुंडा डुंगीनपारा जंगलातील पोलिस-नक्षल चकमकीत सहभागी होता.

महाराष्ट्रातही सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत सहा वरिष्ठ जहाल नक्षलवादी २४ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश कुळमेथे, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का सडमेक, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी, समीर आयतू पोटाम आणि नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी यांचा समावेश आहे. शासनाच्या २००५ पासून सुरू असलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पुनर्वसन धोरणामुळे आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१६ नक्षलवादी शरण आले आहेत.