सर्वविनाशी डावा विचार: आर्थिक साम्यवाद

Total Views |

साम्यवाद विचारसरणी तशी सर्वांसाठीच परिचित. अनेक देशांनी या तत्त्वज्ञानाचा वापर करत काही काळ औद्योगिक प्रगतीही साधली. मात्र, त्यानंतर त्यातील दोषांमुळे मानवी मनाच्या होत असलेल्या संकोचाने अनेक देशांमधील सरकारांना जनतेच्या उठावास सामोरे जावे लागले. या साम्यवादाचा उगम आणि फोलपणा याचा घेतलेला आढावा...


भांडवलशाही व्यवस्था बेंथमच्या नीतिशास्त्रातून आलेल्या, उपयुक्ततावादाच्या तत्त्वाचा आधार घेऊन अर्थशास्त्राची मांडणी करते. आर्थिक विषमता हे या व्यवस्थेत त्याज्य मूल्य नाही. उलट गुणवंतसत्तेचा पुरस्कार करून, या व्यवस्थेत विषमतेचे एक प्रकारे समर्थनच केले जाते. बाजारपेठीय व्यवस्थेत होणारे संसाधनांचे समाजातील वाटप हे उपयुक्तता आणि उत्पादकतेची कार्यक्षमता, या तत्त्वांच्या आधारे गणिती सुनिश्चिततेने होत असते आणि त्यामुळे त्यात चूक घडण्याची काही शयताच नसते. समाजातील गुणवंत व्यक्ती आपल्या अंगभूत कार्यक्षमतेच्या जोरावर संसाधनांची मालकी मिळवत असतात आणि त्यातून निर्माण होणारी विषमता ही गुणवत्तेच्या अभावाने असल्याने, एकार्थी नैसर्गिकच आहे. सामाजिक विषमतेकडे सरळसरळ डोळेझाक करणे आणि गुणवंतसत्तेच्या तत्त्वातील फोलपणा समजण्यातील अपयश, हे अशा व्यवस्थेची परिणती मूठभर लोकांच्या जाचक सत्तेत होणे स्वाभाविक होते. साम्यवादाच्या यथार्थ आकलनासाठी, युरोपीय अर्थविचाराची ही पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.

साम्यवादाचा प्रणेता कार्ल मार्स असल्याचे जरी मानले जात असले, तरी या विचारांचे मूळ हेगेलच्या विरोधविकासाच्या तात्त्विक मांडणीत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर विशेषतः ब्रिटनमध्ये उदयास आलेला मजूर वर्ग आणि या वर्गाचे अत्यंत हलाखीचे राहणीमान, हा त्या काळातील अनेक युरोपीय तत्त्वचिंतकांच्या चिंतेचा विषय होता. भांडवलशाही व्यवस्थेत या प्रश्नाचे उत्तर तर नव्हतेच पण, ते शोधायची आवश्यकताही नाही, अशी सैद्धांतिक मांडणी भांडवलशाहीची होती, हे आपण पाहिले. या विचाराला प्रत्युत्तर म्हणून अर्थव्यवहारावर बाजारपेठेचे आणि तिच्या अदृश्य हाताचे सर्वंकष नियंत्रण असू नये, असे विचार पुढे आले. निरीश्वरवादी विचारांतून निर्माण झालेली तत्त्वज्ञाने, याच काळात व्यक्ती आणि समाज यांच्या परस्परसंबंधांचे सूत्र कोणते याचा शोध घेत होती. सामाजिक व सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी राज्यव्यवस्थेचे महत्त्व प्रतिपादन केले जात असताना, त्याच राज्यव्यवस्थेने अर्थव्यवहारांचेही नियमन करावे, असा विचार स्वाभाविकपणे भांडवलशाहीचे उत्तर म्हणून मांडला जाऊ लागला. हेगेलचे विरोधविकासाचे उत्तर हे भांडवलशाहीतून आलेल्या विषमतेला, तर्कप्रधानतेच्या चौकटीत राहून दिले गेलेले उत्तर आहे.

विरोधविकासाच्या तत्त्वानुसार कोणत्याही समाजात आर्थिक विषमतेच्या आधारावर निर्माण होणारे दोन वर्ग असतात. त्यातील धनवान वर्गाच्या हातात योग्य मर्यादेपेक्षा अधिक संपत्तीचा संचय झाल्यावर, गरीब वर्गाच्या शोषणाची व्यवस्था आपोआपच निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास गरीब वर्ग उठाव करून, धनवान वर्गाची मक्तेदारी मोडून काढतो आणि एक नवीन रचना निर्माण करतो. हेगेलने हे तत्त्व केवळ आर्थिक विषयातच वापरले असे नाही, तर सामाजिक बदलांचा इतिहास अभ्यासण्यासाठीसुद्धा त्याने या विरोधविकासाच्या तत्त्वाचा वापर केला.

मार्सने हेगेलचे विरोधविकासाचे तत्त्व थोडेसे बदलून, संघर्षातून विकासाचे तत्त्व मांडले. हेगेलच्या मांडणीतील अंतिम आदर्शस्थितीचे वर्णन नाकारून, मार्सने सततच्या संघर्षाचे तत्त्व स्वीकारले. या संघर्षाचे मूळ कारण समाजातील भेदांचे निराकरण असल्याचे निदान मागे पडून, संघर्ष हेच महत्त्वाचे तत्त्व असल्याचे प्रतिपादन मार्सने केले. या संघर्षाची परिणती काय? याचे मार्सच्या विचारातील उत्तर हे एका आदर्श सामाजिक स्थितीचे होते, ज्यात शोषित वर्गाची संपूर्ण सत्ता अपेक्षित होती. परंतु, या स्थितीपर्यंत कसे जावे, याचे कोणतेही विवेचन यात नव्हते. संपूर्ण सत्ता ही आदर्श स्थिती मानली गेल्याने, राष्ट्रीय समाजाची राज्यव्यवस्था विरोधविकासाच्या तत्त्वाची अंतिम स्थिती असू शकत नव्हती. स्वाभाविकपणे मार्सचे तत्त्वज्ञान सततच्या संघर्षाचे आणि स्थानीय अराजकतेचे होते.

मार्सच्या सततच्या संघर्षाच्या प्रतिपादनास फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी होती. आज मार्सवादाला ‘डावा विचार’ असे जे संबोधले जाते, त्यास फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेत डावीकडे बसणार्या जहाल जॅकोबिन गटाचा संदर्भ आहे. संघर्ष आणि अराजकता ही दोन्ही लक्षणे जॅकोबिन गटाचीच होती परंतु, मार्स फ्रेंच राज्यक्रांतीचा सैद्धांतिक विचारही काही प्रमाणात नाकारतो. कोणत्याही राष्ट्रीय समाजाचे अस्तित्व नाकारून केवळ आर्थिकदृष्ट्या शोषक आणि शोषित असे दोनच वर्ग मानल्याने आणि त्यातील शोषित वर्गाची संपूर्ण सत्ता स्थापित झाल्याशिवाय संघर्ष सुरूच ठेवण्याचे मानल्याने, मार्सचा विचार सर्व आधीच्या तत्त्वचिंतकांशी फारकत घेऊन नवा विचार मांडतो.

डाव्या विचारातील एक महत्त्वाचा कच्चा दुवा म्हणजे, व्यक्तीच्या अंतःप्रेरणांना दिलेले गौण महत्त्व. साम्यवादी तत्त्वज्ञान हे संपूर्ण जागतिक मानवी समाजात दोन विभागांमध्ये वाटते परंतु, प्रत्यक्षात मानवी समाजात अनेक प्रतलांवर आणि अनेक परिमाणांवर अनेक स्तर अस्तित्वात असतात. या सर्व स्तरांचे एकमेकांशी होणारे छेदन आर्थिक उच्चनीचतेवर ठरवता येत नाही. अनेकानेक पातळ्यांवर अस्तित्व असलेल्या समाजाचे सर्व प्रश्न केवळ संघर्षाने सोडवताही येत नाहीत, तर त्यासाठी सामंजस्याच्या तत्त्वाची आवश्यकता भासते. परंतु, केवळ साम्यवादी विचारसरणीतील या कमकुवत बाजू पाहण्याऐवजी, साम्यवादी विचार हा जडवादी आर्थिक विचारांच्या शृंखलेतील एक पुढची कडी कशाप्रकारे आहे हे लक्षात घेणे निर्वसाहतीकरणाच्या आकलनासाठी आपल्याला आवश्यक आहे. साम्यवाद नवीन आर्थिक मांडणी करताना देकार्तीय विकलन पद्धतीची चौकट मोडत नाही. त्याउलट आपले प्रतिपादन अधिक शास्त्रीय स्वरूपाचे कसे आहे, ते दाखवणे हाच मार्सवादाचा प्रयत्न आहे. भांडवलशाही व्यवस्थेतून निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेला उत्तर म्हणून साम्यवादी क्रांती होणे निश्चित आहे, हे गणिती पद्धतीने सिद्ध केल्यानंतर तसे प्रत्यक्ष घडण्याची वाट पाहणे, एवढेच मार्ससाठी आवश्यक होते. साम्यवादी चिंतन भांडवलशाहीच्या अर्थप्रधानतेसच पुढे नेते आणि त्यामुळे तो जडवादी अर्थचिंतनातीलच एक वेगळा मार्ग बनतो, हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये होणे अपेक्षित असलेली साम्यवादी क्रांती सर्वप्रथम जेव्हा शेतीप्रधान रशियात झाली, तेव्हा साम्यवादाच्या मूळ तत्त्वांना प्रश्नचिन्ह लावणे आवश्यक होते. परंतु, रशियन झारच्या जुलमाखाली पिचलेली जनता कशी क्रांतीसाठी योग्य होती, अशी त्या क्रांतीची पाठराखण केली गेली. परंतु, रशियन क्रांती हा लोकांचा उठाव नसून पहिल्या महायुद्धानंतर कमकुवत झालेल्या युरोपियन राज्यसत्तांना संधी साधून धक्का देण्याचा, काही साम्यवादी कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. लेनिन त्यात यशस्वी झाला आणि रशियाचे साम्यवादी सरकार स्थापन झाले. रशियाचे प्रचंड औद्योगिकीकरण त्यानंतरच्या काही दशकांत झाले आणि दुसर्या महायुद्धापूर्वी रशिया हा एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश होता. परंतु, सरकारने वित्तपुरवठा करून सुरू केलेले सरकारी मालकीचे औद्योगिकीकरण, लोकांचे राहणीमान उंचावण्यास कारणीभूत ठरत नव्हते. साम्यवादाच्या तत्त्वानुसार संसाधनांचे समान वाटप होत असल्याने, व्यक्तिगत कर्तृत्वाच्या अवकाशाचा पराकोटीचा संकोच साम्यवादी रशियात झाला. रशियाच्या कथेची पुनरावृत्ती १९६०च्या दशकानंतर चीनमध्ये झाली. सरकारी बळाचा वापर करीत सक्तीचे औद्योगिकीकरण आणि व्यक्तिगत सर्जनशीलतेचा पूर्ण लोप, हे या दोन्ही राजवटींचे प्रमुख लक्षण होते.

परंतु, या सर्व क्रांत्यांच्या सुरुवातीच्या काळात जगासमोर आली ती साम्यवादाने केलेली आर्थिक प्रगती. साम्यवादी रशिया दुसर्या महायुद्धानंतर भांडवलशाही अमेरिकेस टक्कर देणारी एकमेव महाशक्ती होती. त्यामुळे डाव्या विचारातील समाजव्यवस्थेची होत जाणारी दुर्दशा, तिच्या आर्थिक यशस्वीतेपुढे लपवली जात होती. प्रथम रशिया आणि नंतर चीनकडे पाहून, अनेक देशांनी त्या काळात साम्यवादी व्यवस्थेचा अंगीकार केला होता परंतु, व्यक्तींच्या स्वाभाविक आकांक्षा मारून, केवळ सामाजिक सौख्याची चिंता व्यक्तींना उठाव करण्यास भाग पाडत होती. अनेक देशांतील साम्यवादी राजसत्तांनी असे उठाव रोखण्यासाठी, राजकीय आणि सामरिक बळाचा वापर केला आहे. चीनमधील तियाननमेन चौकातील घटना प्रसिद्ध आहेच पण, त्याहून कित्येकपट क्रूर घटना कंबोडियातील पोल पॉटच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत.

भारतीय दृष्टीने विचार करता जडवादी आर्थिक चिंतनातील फोलपणा आपण सोडून देऊ. पाश्चात्य विचारातही डाव्या विचाराला स्थिर पृष्ठभूमी मिळत नाही आणि या व्यवस्थेतून दीर्घकालीन आर्थिक संपन्नता संभव नाही, हे स्पष्ट होते. तरीही डाव्या विचाराचे अवलंबन भारतासहित अनेक राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करण्यात आले. तोट्यात जाणारे राष्ट्रीय उद्योग, कधी न पूर्ण होणार्या पंचवार्षिक योजना इत्यादींमुळे, भारताच्या विकासाला १९९०च्या दशकापर्यंत कसे ग्रहण लागले होते ते सर्वश्रुतच आहे. या डाव्या विचाराचा प्रभाव जितका आर्थिक आहे, तितकाच तो मानसिकही आहे. सततच्या संघर्षाचे तत्त्व व्यक्तींमधील अविश्वासाला जन्म देते आणि असे परस्परव्यवहारातील विषारी तत्त्व उद्यमितेस मारक ठरते. आज उदारीकरणाच्या धोरणास ३० वर्षे झाल्यानंतरही, भारतीय समाजात उद्यमितेविषयीची भूमिका नकारात्मकच आहे.

डाव्या आर्थिक विचाराला परास्त करण्याची आज थेट आवश्यकता नाही. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर आज साम्यवादाच्या आर्थिक विषयाकडे कोणी विशेष गांभीर्याने पाहत नाही परंतु, साम्यवादी विचार हा त्याच जडवादी अर्थविचाराची एक वेगळी दिशा आहे, हे लक्षात घेतल्यास त्याविरुद्धच्या अर्थचिंतनाची वाट शोधणे आवश्यक ठरते. तर्कसुसंगत मांडणीची आवश्यकता मानणारे विचार, मानवी समाजव्यापारांना आर्थिक आणि सामाजिक या खोयांमध्ये बंदिस्त करतात. या सर्व चिंतनांना त्यांच्या खोयातून मुक्त करून, एकात्मिक विचारांचे सिद्धांतन पुढे आणणे हीच आजची आवश्यकता आहे.

डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३



डॉ. हर्षल भडकमकर

मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.