नागपूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधार करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, आज भारत वर्ष आणि १४० कोटी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असून देशात नव परिवर्तनाची लाट आली असल्याचे मत महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले.
बावनकुळे म्हणाले की, सकाळपासून रात्रीपर्यंत दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर दर कमी करण्यात आला आहे. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे रद्द झाला असून त्यामुळे जनतेला थेट लाभ मिळणार आहे. ट्रॅक्टरवर सुमारे ७० हजार रुपये, तर कारवर तब्बल ८० हजार रुपयांचा फायदा झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे,” असे ते म्हणाले
पंतप्रधान यांनी निवडणुकीत मांडलेला गरीब कल्याणाचा संकल्पनामा आता प्रत्यक्षात दिसून येतो आहे. स्वदेशी वस्तूंवरील कर दर कमी झाल्यामुळे देशी उद्योगांना चालना मिळेल. भारतीय कंपन्यांना यामुळे मोठा आधार मिळेल, देशातील पैसा देशातच राहील आणि स्वदेशी वापराला गती मिळेल. आजच्या जीएसटी सुधारणांमुळे संपूर्ण देशात नव परिवर्तनाची लाट आली आहे. २०४७ च्या विकसित संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे असेही त्यांनी नमूद केले.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी जनतेला शुभेच्छा देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आई जगदंबा आपल्या भक्तांना आशीर्वाद देईल. महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांवर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटातून त्यांना लवकरच मार्ग काढता येईल. या संकट काळात आई जगदंबेचे आशीर्वाद सोबत राहतील, असा मला विश्वास असल्याचे बावनकुळे म्हणाले.