पीओके लवकरच भारतात सामील होणार – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

    22-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली, पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारत कोणत्याही आक्रमक लष्करी कारवाईशिवाय परत मिळवेल, असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते मोरोक्कोमधील भारतीय समुदायाला संबोधित करत होते.

संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सध्या पीओकेमधील लोकच विद्यमान शासनाविरोधात आवाज उठवत असून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.पीओके तर आपोआपच भारतात येईल, तेथे आता तसा आवाज उठण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच पीओके स्वत:हूनच भारतात सामील होईल, असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला.

राजनाथ सिंह यांनी पुढे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूर भाग-२ किंवा भाग-३ होईल का, हे पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून आहे. जर तो दहशतवादाला पाठिंबा देत राहिला, तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संरक्षणमंत्री यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्याशी बैठक घेतली होती.

त्यांनी पुढे सांगितले की, जैश-ए-मोहम्मदच्या एका वरिष्ठ दहशतवाद्याने देखील मान्य केले की भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे झाले. त्यानंतर पाकिस्तान युद्धविरामाची मागणी करत आला आणि भारताने ती मान्य केली. मात्र, पंतप्रधान मोदींनीदेखील स्पष्ट केले आहे की हे फक्त एक विराम आहे. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, पण पुन्हा सुरू होऊ शकते, असे सिंह यांनी सांगितले.