मुंबई, भाजपा चांदिवली विधानसभा प्रभाग क्रमांक १५७ चे माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा आज भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि भाजपा गटनेत्र आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मुंबईला आकार दिला जातोय. येणाऱ्या ५-१० वर्षांमध्ये जसा मुंबईचा चेहरा बदलला तशाच पद्धतीने चांदिवलीचा चेहरामोहराही महायुती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दरेकर म्हणाले कि, भाजपचा झंझावात देशभर, महाराष्ट्रात सुरु आहे. तसाच झंझावात मुंबईतही सुरु आहे. चांदिवली हे माझ्यासाठी माहेरघर असल्यासारखे आहे. येथील लोकांचा सासुरवास कोण करणार असेल तर भाजपा व सरकार तुमच्या पाठीशी आहे. आजही संघर्ष नगर मधील लोकं अनेक समस्यांचा सामना करत आहेत. येथील लोकांना न्याय द्यायचा आहे. सत्तेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे व येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेवरही भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले कि, महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. २५-३० वर्ष मुंबई महापालिका उबाठाच्या हातात होती. बाळासाहेब ठाकरे असताना मुंबईतील विकास होत होता, प्रामाणिक काम होत होते. परंतु उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आल्यानंतर या मुंबईला लुटण्याचे काम केले गेले. मराठी माणसाच्या केवळ गप्पा मारायच्या. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जातोय, मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाही, मग उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत दरेकर पुढे म्हणाले कि, तुम्ही केले नाही म्हणून देवाभाऊंनी मुंबईतील एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही ही भूमिका घेतलीय. अभ्यूदय नगर, बीडीडी चाळीचा विकास असेल मुंबई मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसतेय. जनता जनार्दनाचा अशाच प्रकारे आशीर्वाद राहिला तर येणाऱ्या ५-१० वर्षात मुंबईचे चित्र बदलल्याशिवाय भाजपा महायुती राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.
एसआरएच्या इमारतीही पुनर्विकसित स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून करूयावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, विकासकाशिवाय इमारत उभी राहयला हवी त्यासाठी स्वयं पुनर्विकास योजना आणली. या योजनेला मुंबई बँक पैसे देते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व परवानग्या देतात. माझ्या अभ्यास गटाचा जो अहवाल सरकारला दिलाय त्यात एसआरएच्या इमारतीही स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून पुनर्विकसित करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. एसआरएच्या इमारतीही स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून पुनर्विकसित करू, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.