नवी दिल्ली, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (डुसू) निवडणुकीत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. अभाविपने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन प्रमुख पदे मोठ्या फरकाने जिंकली आहेत.
अध्यक्षपदावर अभाविपचे उमेदवार आर्यन मान यांनी तब्बल १६,१९६ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. हा डूसू अध्यक्षपदाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय मानला जात आहे. सचिवपदावर कुणाल चौधरी यांनी ७,६६२ मतांच्या फरकाने यश मिळवले, तर सहसचिव पदावर दीपिका झा यांनी ४,४४५ मतांच्या फरकाने बाजी मारली. या प्रचंड विजयानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अभाविपवरील आपला विश्वास अधोरेखित केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष आर्यन मान यांनी या विजयाला जनरेशन-झेड (जेन झी) पिढीतील राष्ट्रनिष्ठ चेतनेचा प्रतिध्वनी म्हटले. त्यांनी सांगितले की, दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज स्पष्ट संदेश दिला आहे की, ते राष्ट्रविरोधी आणि भारतविरोधी विचारांना कधीच मान्यता देणार नाहीत. ही विजयगाथा भ्रष्ट राजकारण आणि पोकळ आश्वासनांविरुद्धचा विद्यार्थ्यांचा ठाम प्रतिसाद आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी मेट्रो कन्सेशन पास, पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभाविपने आवाज उठवला आहे. आता या आश्वासनांवर त्वरेने काम सुरू केले जाईल.
नवनिर्वाचित सचिव कुणाल चौधरी यांनी म्हटले की, आजच्या तरुण पिढीने जातीयवाद, भ्रष्टाचार आणि संकुचित मानसिकतेला स्पष्टपणे नाकारले आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित, पारदर्शकता आणि विद्यार्थीहिताचा मार्ग निवडला आहे. हा विजय विद्यापीठातील सकारात्मक व रचनात्मक राजकारणाची ग्वाही देतो. सहसचिवपदी विजयी झालेल्या दीपिका झा यांनी आपल्या विजयाचे श्रेय अभाविपच्या धोरणात्मक लढाईला आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणाला दिले. त्यांनी सांगितले की, "गेल्या दहा वर्षांत डूसू निवडणुकीत अभाविपच्या महिला उमेदवारांनी सातत्याने विजय मिळवला आहे. ही परंपरा या वेळीही कायम राहिली. हा केवळ माझा व्यक्तिगत विजय नाही तर विद्यापीठातील हजारो विद्यार्थिनींच्या अभाविपवरील विश्वासाचा विजय आहे.
दरम्यान, काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयुआयला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे.
विद्यार्थ्यांचा पाठिंबा 'राष्ट्र प्रथम' विचारधारेस – अमित शाह, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मिळवलेल्या प्रचंड विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. हा विजय युवांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेवरील दृढ विश्वासाचे प्रतिबिंब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशामुळे परिषदेची विद्यार्थी शक्ती राष्ट्रशक्तीत रूपांतरित करण्याच्या प्रवासाला अधिक वेग मिळणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.