नवी दिल्ली, जैश-ए-मोहम्मदनंतर आता लष्कर-ए-तोयबाचा कमांडर कासिमने थेट कबुली दिली आहे की, पाकिस्तानातील मुरिदके येथे असलेला लष्करचा मुख्य तळ (मरकज तैयबा) भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झाला होता. पाकिस्तान सरकारने सातत्याने भारतीय लष्करी कारवाईचे नुकसान नाकारले असले तरी व्हिडिओमध्ये कासिम स्वतः या सत्याची साक्ष देताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये कासिम म्हणतो, आपण मुरिदके येथील मरकज तैयबाच्या खंडहरांवर उभा आहे, जे भारतीय हल्ल्यात नष्ट झाले होते. याचे पुनर्निर्माण सुरू आहे. अल्लाहच्या कृपेने ही मशिद पूर्वीपेक्षा मोठी बनवली जाईल. कासिम पुढे असेही सांगतो की, या मशिदीत मोठ्या प्रमाणावर मुजाहिदीन आणि तलबा (विद्यार्थी) यांना प्रशिक्षण देण्यात आले होते आणि इथूनच अनेक दहशतवादी कारवायांसाठी ते रवाना झाले. हे उघड वक्तव्य पाकिस्तान सरकारच्या भूमिकेला थेट छेद देणारे आहे, कारण पाकिस्तान सतत सांगत आला आहे की भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली इमारत दहशतवादी वापरात नव्हती.
समाजमाध्यमांवरर प्रसारित होत असलेल्या फिरत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कासिमने पाकिस्तानातील तरुणांना थेट आवाहन केले आहे की त्यांनी ‘दौरा-ए-सुफ्फा’ या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे. हा कार्यक्रम धार्मिक विचारसरणीसोबतच मूलभूत दहशतवादी प्रशिक्षण देतो आणि प्रत्यक्षात जिहादी प्रशिक्षण शिबिर मानला जातो.
मुरिदके हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील शहर आहे. याच शहरात लष्कर-ए-तोयबाचा मुख्य तळ असल्याची माहिती भारत अनेक वर्षांपासून देत आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतरही पाकिस्तान नाकारत राहिला, पण आता कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली आहे.