राहुल गांधींच्या तोंडी पाकिस्तानची भाषा – किरेन रिजिजू यांचा घणाघात

    19-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. राहुल गांधींची विधाने नेहमीच पाकिस्तानच्या भाषेशी मिळतीजुळती असतात आणि त्याचा थेट फायदा पाकिस्तानातील भारतविरोधी गटांना होतो, असा गंभीर आरोप रिजिजू यांनी केला.

दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना रिजिजू म्हणाले, गेल्या काही वर्षांत आम्ही एक पॅटर्न स्पष्टपणे पाहिला आहे. पाकिस्तान जे कथानक रचतो, त्याच प्रकारची भाषा राहुल गांधी आणि त्यांची टीम भारतात वापरते. आणि नंतर तीच भाषा पाकिस्तानातील भारतविरोधी गटांनी प्रचारासाठी वापरलेली दिसते. हा योगायोग नाही तर ठरावीक पद्धत आहे.

रिजिजूंची ही टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या हल्ल्यानंतर समोर आली आहे. राहुल गांधींनी गुरुवारी असा आरोप केला होता की, निवडणूक आयोग लोकशाही प्रक्रियेचा नाश करण्यासाठी आणि निवडणुकीतील पारदर्शकता संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी संगनमत करत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की आयोग पूर्णपणे स्वतंत्रपणे व निष्पक्षपणे काम करत आहे.

काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना रिजिजू म्हणाले, “जेव्हा देशाची प्रतिष्ठा आणि लोकशाही संस्था धोक्यात आणणारी विधाने भारताच्या एका प्रमुख पक्षाचा खासदार करतो, तेव्हा त्याचा थेट फायदा पाकिस्तान आणि इतर शत्रूराष्ट्रांना होतो. देशाच्या सुरक्षेवर व लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे हे प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहेत.