भेदरलेल्या नक्षलवाद्यांची कहाणी ; शांतीवार्ता करण्याची विनवणी

    18-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : देशातून ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सुरक्षादले धडाक्यात कारवाई करत आहेत. कारवाईत नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर मारले जात आहेत, त्यामुळे भेदरलेल्या नक्षलवाद्यांनी आता शांतीवार्ता करण्याची विनवणी केल्याचे समोर येत आहे.

छत्तीसगढमध्ये सुरू असलेल्या नक्षलवादी कारवायांमुळे नक्षलवादी घाबरले आहेत. नक्षलवादी चकमकीत माओवादी संघटनेच्या वरिष्ठ कमांडर्सचा मृत्यू आणि वाढते आत्मसमर्पण यामुळे नक्षलवाद्यांची व्यवस्था कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत, नक्षलवाद्यांनी मंगळवारी एक प्रेस नोट जारी करून सशस्त्र संघर्ष तात्पुरता सोडून शांतता चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. नक्षलवाद्यांनी सरकारला युद्धबंदीचे आवाहन केले आहे. सीपीआय (माओवादी) ने म्हटले आहे की, सरकारने देशातील अनेक राज्यांमध्ये तुरुंगात असलेल्या साथीदारांशी चर्चा करण्याची परवानगी द्यावी. त्याचबरोबर पोलिसांनीही एक महिन्यासाठी ही कारवाई थांबवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

अर्थात, नक्षलवाद्यांच्या या पत्राविषयी छत्तीसगढचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. पत्राची सत्यता पडताळून पाहावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाया सुरूच राहतील. जर नक्षलवाद्यांना त्यांच्या बंदुका सोडून मुख्य प्रवाहात परत यायचे असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे.

असे आहे नक्षलवाद्यांचे रडगाणे

माओवादी संघटनेचे केंद्रीय प्रवक्ता अभय यांच्या नावे असलेले पत्र व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, संघटना सध्या सशस्त्र संघर्ष अस्थायी थांबवून समस्यांच्या समाधानासाठी जनसंघर्षावर लक्ष केंद्रित करणार आहे. देशातील राजकीय पक्ष आणि संस्थांसोबत काम करण्यास तयार असून बदलत्या परिस्थितीला पाहता शांती वार्तेसाठी तयार आहे; परंतु त्यांच्या विचारधारा आणि राजकीय तत्त्वांपासून मागे हटणार नाही. सरकार आणि सुरक्षा दलांनी दमनात्मक कारवाई थांबवून विश्वासार्ह वातावरण तयार करावे, तसेच संघटनेच्या शीर्ष नेतृत्व, केडर आणि तुरुंगामधील सदस्यांना वार्ता प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे. यापूर्वीच्या प्रस्तावास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, उलट जानेवरी २०२४ पासून कारवाईचा वेग वाढवला असल्याचे रडगाणे गाण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ठाम भूमिका

एकेकाळी पशुपती ते तिरुपती असा हिंसेचा ‘रेड कॉरिडॉर’ तयार करणाऱ्या नक्षलवादाचा आज अंताचा प्रवास सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थ नेतृत्व आणि सुरक्षादलांच्या प्रभावी रणनितीमुळे आज देशातील केवळ २३ ते २४ जिल्ह्यांपुरतेच नक्षलवाद्यांचे अस्तित्व उरले असून वर्षभरात तेथूनही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचा विश्वास केंद्र सरकारने बोलून दाखवला आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना स्वातंत्र्य देण्याचे धोरण केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवले आहे. शाह यांनी २०१९ साली गृह मंत्रालयाचा कारभार हाती घेताच नक्षलवाद संपवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यासाठी त्यांनी कायदा व सुव्यवस्था आणि विकास अशा दोन्ही स्तरांवर काम सुरू केले. त्यामुळे प्रशासन अथवा पोलिस अथवा सरकारी योजनांचा लाभ आतापर्यंत न मिळालेल्या गावांमध्ये सुशासनाचा प्रारंभ झाला. त्याचवेळी हिंसक नक्षलवाद्यांविरोधात कठोर धोरण ठेवून त्यांना ‘आत्मसमर्पण करा’ किंवा ‘मरा’ असे दोनच पर्याय निर्माण केले. या धोरणाचे यश आज देश बघत आहे.