सबरीमला मंदिराच्या द्वारपालक मूर्तीच्या सोन्यात घट; केरळ उच्च न्यायालयाचे चौकशी करण्याचे आदेश

    18-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : सबरीमला मंदिरातील द्वारपालकाच्या (दाराचे रक्षक) मूर्तीवरील सोन्याच्या मुलाम्यात घट झाल्याच्या गैरव्यवहाराटी केरळ उच्च न्यायालयाने गंभीर नोंद घेतली आहे. बुधवारी न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती के. व्ही. जयकुमार यांच्या खंडपीठाने त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या (टीडीबी) मुख्य सतर्कता व सुरक्षा अधिकारी (पोलीस अधीक्षक) यांना सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले.

विशेष आयुक्तांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते की, सोन्याने मढवलेल्या तांब्याच्या पट्ट्या कोणतीही पूर्वसूचना किंवा न्यायालयाची परवानगी न घेता दुरुस्ती व इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी काढण्यात आल्या. हे पट्टे चेन्नईस्थित ‘स्मार्ट क्रिएशन्स’ या फर्मकडे भक्त उन्नीकृष्णन पोत्ती यांच्या प्रायोजकत्वाखाली सुपूर्द करण्यात आले.

न्यायालयाने नोंदवले की या मूर्ती १९९९ साली अधिकृत मान्यतेनंतर बसवण्यात आल्या होत्या. २०१९ मध्ये पुन्हा एकदा पोत्ती यांच्या प्रायोजकत्वाखाली सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. यासाठी तब्बल ४० वर्षांची हमी दिली होती. परंतु अवघ्या सहा वर्षांत दोष निर्माण झाल्याने दुरुस्तीची वेळ आली.

मात्र, यावेळी वजनातील मोठ्या तफावतीमुळे शंका निर्माण झाली आहे. १९ व २० जुलै २०१९ रोजीच्या पंचनाम्यानुसार ४२.८ किलो वस्तू पोत्ती यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. परंतु २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पंचनाम्यात केवळ ३८.२५ किलो वस्तू स्मार्ट क्रिएशन्सकडे पोहोचल्याचे नोंदले गेले. दुरुस्ती व नव्याने मुलामा दिल्यानंतर वजन ३८.६५ किलो इतके नोंदले गेले. जवळपास ४.५४ किलो वजनातील ही तफावत गंभीर असून दिलेल्या स्पष्टीकरणे समाधानकारक नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शिथिलता, नोंदींमधील तफावत व अनियमितता दिसून येतात. त्यामुळे व्यापक चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सतर्कता व सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व नोंदी व रजिस्टर तपासासाठी सतर्कता यंत्रणेकडे परत देण्याचे निर्देश देण्यात आले. चौकशीदरम्यान त्रावणकोर देवस्वम बोर्डाने अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.