‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला गुडघ्यावर आणले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    17-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सौभाग्यावर घाला घातला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने त्यांच्या तळांचा नायनाट केला. आपल्या शूर जवानांनी क्षणात पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे केले. विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी १७ सप्टेंबर या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्वही स्मरण केले. “याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ संकल्पामुळे भारतीय सेनेने हैदराबाद राज्याला निजामच्या अत्याचारातून मुक्त केले आणि ते भारताचा अविभाज्य भाग बनले. आज हा दिवस सरकारने औपचारिक मान्यता देत हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. हा दिवस भारताच्या एकतेचा प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केला. मातृशक्तीच्या आरोग्यासाठी रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, अॅनिमिया आदी आजारांची मोफत तपासणी या मोहिमेत केली जाणार असून त्यावरील खर्च सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील उपचारासाठी आयुष्मान भारत कार्ड संरक्षण कवच ठरेल, असेही ते म्हणाले. याशिवाय आदिवासी समाजातील सिकल सेल अनिमियाविरोधी राष्ट्रीय मोहिमेचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, या आजारावर मात करण्यासाठी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर तपासणी व जनजागृती केली जात आहे.

पंतप्रधानांनी धारमध्ये देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कची पायाभरणी केली. “या पार्कमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल, युवांना रोजगार निर्माण होईल आणि भारतीय वस्त्रोद्योग अधिक स्पर्धात्मक बनेल. तीन लाखांहून अधिक रोजगार संधी या प्रकल्पामुळे निर्माण होतील,” असे ते म्हणाले. याशिवाय पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिरांना प्रशिक्षण, आधुनिक साधने आणि कर्जसहाय्य उपलब्ध होत असून त्यांची कला जगभर पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी स्वदेशी खरेदीचे आवाहन केले. “महात्मा गांधींनी स्वदेशीच्या बळावर स्वातंत्र्य मिळवले. आज विकसित भारत घडवण्यासाठी स्वदेशी हाच मंत्र असला पाहिजे. दिवाळीतील सजावटीच्या वस्तूंपासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्वत्र भारतात बनलेल्या वस्तूंनाच प्राधान्य द्या,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.