नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ७५व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारी आणखी उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनकडून केलेल्या प्रयत्नांना भारताने पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर म्हटले, “आपल्यासारखाच मीही भारत-अमेरिका सर्वंकष आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यास कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाचा शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी तुमच्या उपक्रमांना आम्ही पाठिंबा देतो.”
दरम्यान, ट्रम्प यांनी ट्रूथ या प्लॅटफॉर्मवर लिहिताना मोदींसोबतचा फोनवरील संवाद “अत्यंत चांगला” झाल्याचे म्हटले. “माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उत्तम चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते उत्कृष्ट कार्य करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या आमच्या प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” असे ट्रम्प म्हणाले.
मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही चर्चा अशा वेळी झाली आहे की, अमेरिकेने नुकतेच भारतावर कठोर व्यापारशुल्क लादले आहे. भारतातून होणाऱ्या आयातीवर ५० टक्के कर तर रशियन तेल खरेदीवर २५ टक्के आयात शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेनंतर ट्रम्प यांच्या भाषेत दररोज बदल होत असल्याचे दिसत आहे.