
नवी दिल्ली, मतदारांच्या सोयीसाठी आणि निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकेसंबंधी महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल ‘कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स, १९६१’ मधील नियम ४९बी अंतर्गत करण्यात आले असून आगामी निवडणुकांपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता प्रथमच ईव्हीएम मतपत्रिकांवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे छापली जाणार आहेत. विशेष म्हणजे छायाचित्रात उमेदवाराचा चेहरा तीन-चतुर्थांश भागात स्पष्ट दिसेल, जेणेकरून मतदारांना त्यांची ओळख सहज पटेल.
याशिवाय, उमेदवार आणि ‘नोटा’ यांचे क्रमांक आता मोठ्या व ठळक अक्षरात (बोल्ड फॉन्टमध्ये) छापले जातील. सर्व उमेदवारांची नावे आणि ‘नोटा’ एकाच प्रकारच्या अक्षरशैलीत (फॉन्ट) आणि एकाच आकारात छापली जाणार असून कुठल्याही प्रकारची असमानता राहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतपत्रिकेच्या गुणवत्तेलाही प्राधान्य दिले गेले असून आता ती ७० जीएसएम कागदावर छापली जाईल. विधानसभा निवडणुकांसाठी गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर केला जाईल. या सुधारित मतपत्रिकांचा वापर आगामी निवडणुकांपासून सुरू होईल आणि त्याची सुरुवात बिहारमधून होणार आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया अधिक सोपी व पारदर्शक करण्यासाठी तब्बल २८ नवीन उपाययोजना केल्या आहेत. त्याच मालिकेतील हा ताज्या सुधारांचा भाग आहे.