अमेरिकेच्या टॅरिफ दबावातही भारताच्या निर्यातीला चालना; गतवर्षाच्या तुलनेत ६.१८ टक्क्यांची वाढ

    16-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या टॅरिफ दबावाच्या पार्श्वभूमीवरही भारताच्या एकूण व्यापारात सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत भारताची एकूण निर्यात (माल व सेवा मिळून) ३४९.३५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत ६.१८ टक्क्यांनी जास्त आहे.

या कालावधीत माल निर्यातीत २.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर नॉन-पेट्रोलियम निर्यातीमध्ये वाढीचा दर ७.३५ टक्के इतका आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी निर्यात वृद्धीला विशेष चालना दिली असून या क्षेत्रात तब्बल २५.९३ टक्क्यांची झेप घेण्यात आली आहे. याशिवाय रत्न- दागिने, औषधं व फार्मास्युटिकल्स या क्षेत्रांनाही लक्षणीय यश मिळाले आहे.

दरम्यान, आयातीची आकडेवारी पाहता, एप्रिल–ऑगस्ट २०२५ मध्ये भारताची एकूण आयात ३९०.७८ अब्ज डॉलर इतकी झाली असून त्यात २.४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी, व्यापार तूट कमी होत गेली असून या कालावधीत ती ४१.४२ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही तूट ५२.२७ अब्ज डॉलर इतकी होती, म्हणजे भारताला यंदा सुमारे १०.८५ अब्ज डॉलरने तूट कमी करण्यात यश मिळाले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिकेच्या टॅरिफ दबावामुळे भारताने निर्यातीच्या बाजारपेठा विविध करणे, उत्पादन खर्च कमी करणे, तसेच सेवा निर्यात अधिक मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी आगामी काळात भारताची व्यापार स्थिती अधिक स्थिर व शाश्वत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संकटातून मार्ग

भारताच्या निर्यातीसमोर अमेरिकेने काही उत्पादनांवर लादलेला ५० टक्क्यांपर्यंतचा टॅरिफ हा मोठा धोका मानला जात आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्र, जेम्स- ज्वेलरी आणि समुद्री खाद्य या क्षेत्रांवर त्याचा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये सवलती, आंतरिक मागणी वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले तसेच विशेष निर्यात सहाय्य पॅकेज या बाबत चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.