
अलिबाग - रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी, अलिबाग या संस्थेस शतकपूर्ती झाल्यानिमित्त क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ येथे संस्थेचा शतक महोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी शिक्षकांचा आशीर्वाद असणे आणि शिक्षकांचे दर्शन होणे हे आमच्यासारख्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठी प्रेरणा असते, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष राजेश सुर्वे, मानद सचिव देवानंद गोगर, उपाध्यक्ष प्रतिभा पाटील, सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांसह संचालक, माजी पदाधिकारी, माजी संचालक आणि मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, मी सहकार क्षेत्रात गेली २५ वर्ष काम करतोय. त्यामुळे सहकारी संस्था काढणे, चालवणे आणि टिकवणे हे अवघड काम असते. अशा परिस्थिती शिक्षक पतपेढी १०० वर्ष पूर्ण करतेय,हा दैदीप्यमान असा टप्पा पार पाडताय याचा सार्थ अभिमान आहे. अनेक ठिकाणी सहकारी संस्था कर्ज देणे, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम करतात. या संस्थेच्या आजी माजी संचालक मंडळाने संस्थेच्या वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले, मी ज्या ज्या संस्थेत गेलो त्या ठिकाणी त्या संस्थेची पत वाढविण्याचेच काम केले. मुंबई बँकेचे नेतृत्व करत असताना सामाजिक बांधिलकीतून काम केले. राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पाना हातभार लावला. माझे कार्यक्षेत्र मुंबई आहे. परंतु शेतकऱ्यांची मुले खेड्यापाड्यातून मुंबईत येऊन अशा प्रकारच्या संस्थेत असू तर त्याचा उपयोग ग्रामीण भागासाठी झाला पाहिजे याची जाणीव ठेवून काम केले. मध्यमवर्गीय मराठी माणसासाठी मुंबईत क्रांतिकारी निर्णय घेतला व स्वयं पुनर्विकास योजना आणली. कर्ज धोरण तयार केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिला. गृहनिर्माण परिषदेत १८ मागण्या केल्या त्यापैकी १६ शासन निर्णय केले. मुंबईत विनाविकासक स्वयं पुनर्विकास योजना सुरु आहे. नावीन्यपूर्ण विचार करून काम केले तर आपण क्रांती करू शकतो, असेही दरेकर म्हणाले.
मुंबई बँकेमार्फत ७ कोटी उपलब्ध करून देणारदरेकर म्हणाले कि, आपली संस्था हजारो कोटींवर गेली पाहिजे, संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना दुसऱ्या कुठल्याही आर्थिक संस्थेकडे जाता कामा नये. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता या प्राथमिक शिक्षक पतपेढीत असेल. तुम्हाला जे सहकार्य, ताकद लागेल ती मुंबई बँक तसेच राज्य सरकार म्हणून पूर्णपणे पाठीशी उभे राहू. तुमच्या संस्थेला ७ कोटीही मुंबई बँक उपलब्ध करून देईल, शिक्षकांच्या घरांचा प्रश्न असेल त्यासाठी जिल्हा बँक मदत करेल, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.