सोने-चांदी आणि दरवाढीची झळाळी

    12-Sep-2025   
Total Views |

सोने आणि चांदीच्या दरांवर जागतिक परिस्थिती आणि देशांतर्गत घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांच्या दरांत सतत चढ-उतार पाहायला मिळते. अनेकदा गुंतवणूकदार खरेदी करतात, तेव्हा भाव चढे असतात. खरेदी केल्यानंतर दर खाली आले की गुंतवणूकदार घाबरत आणखी नुकसान होऊ नये, म्हणून झाले तेवढे नुकसान सोसून विकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम घेण्याची क्षमता, वाट पाहण्याची क्षमता यांचा विचार करावयास हवा.


सोने-चांदी खरेदी केल्यापासून त्याचा भाव सतत वाढलाच पाहिजे, असा विचार करू नये. कारण, सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत असतात. अशा वेळी भाव घसरतात, तेव्हा संधीचा फायदा घेऊन खरेदी करणे योग्य. सध्या जागतिक परिस्थिती अस्थिर आहे. या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

सद्यस्थिती


ऑक्टोबर २०२३ मध्ये जेव्हा गाझा इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले, तेव्हापासून सोन्याच्या भाववाढीला सुरुवात झाली. इराण आणि इस्रायलमध्ये युद्घ भडकले तेव्हादेखील सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आगामी सहा ते आठ महिन्यांत सोन्याचा दर प्रतिऔंस ३ हजार, ३५०च्या पातळीवरून २०० डॉलर्स कमी-अधिक होऊ शकतो. सोन्याचा दर प्रतिऔंस ३ हजार, १०० ते ३ हजार, ६०० डॉलर्सपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या प्रक्रियेत सोन्याचा दर कमी होईल, तेव्हा खरेदी करण्याचे धोरण ठेवावे. आतापर्यंत सोन्याचा परतावा पाहिला, तर सोन्याने नेहमीच चांगला परतावा दिला आहे. उदाहरण घ्यायचे तर, महागाई आठ टक्के असेल, बँकांकडून सहा ते सात परतावा मिळत असेल व त्याचवेळी सोने जर १२ टक्के परतावा देत असेल, तर ही गुंतवणूक नक्कीच लाभदायी आहे.

दुसरीकडे चांदीने जूनमध्ये प्रतिऔंस ३५ डॉलर्सचा टप्पा गाठला होता. याआधी २०११ मध्ये चांदीने प्रतिऔंस ४७ डॉलर्सचा विक्रमी टप्पा गाठलो होतो यापूर्वी १९८० मध्ये एकदाच चांदी प्रतिऔंस ५० डॉलर्सच्या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर गेली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत चांदी प्रतिऔंस ५० डॉलर्सची पातळी गाठेल, अशी अपेक्षा करता येऊ शकते. सोने नवनवे उच्चांक गाठत आहे, तर चांदीही नवा उच्चांक गाठू शकते. आपल्या देशात पुढील १५ ते २० महिन्यांत चांदीचा दर प्रतिकिलो साधारण १.५० लाख रुपयांवर जाऊ शकतो.

सोन्याची भाववाढ कायम राहण्यामागचे मोठे कारण म्हणजे, महागाईची भीती. अमेरिकेतील महागाई नियंत्रणात येत नाही, त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात करणे रोखले आहे. दोनवेळा व्याजदर कपात केली. मात्र, महागाई कमी होत नसल्यामुळे त्यावर रोख लावला आहे. महागाईवाढीची अनेक कारणे आहेत. सरकारचा खर्च वाढला आहे. सरकारला करसवलती द्यायच्या आहेत. मात्र, त्यामुळे महसूल कमी होणार, वित्तीय तूट वाढणार, म्हणजे पुन्हा महागाई वाढणार. त्याची भर करण्यासाठी कर वाढवले, तर उद्योगक्षेत्रात मंदी येऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी वाढू लागेल. हे दुष्टचक्र आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयातशुल्क धोरणासारखे निर्णय त्यांच्यासाठीच त्रासदायक ठरले आहेत.त्यामुळे सोन्याची मागणी वाढण्याला चालना मिळत आहे.

पूर्वी म्हणजे साधारण दहा वर्षांपासून सोने आणि चांदीमधील गुणोत्तर १ : ८० असे होते. म्हणजेच, एक किलो सोने हे ८० किलो चांदीच्या बरोबरीचे असते. हे प्रमाण आदर्श मानले जाते. मात्र, हे प्रमाण एकास ९५ ते १०० असे झाले होते. म्हणजेच, आज एक किलो सोने हे प्रमाण ९५ ते १०० किलो चांदीच्या बरोबरीचे आहे. सध्या ते प्रमाण १ : ९० पर्यंत आले आहे. हे प्रमाण १ : ८०च्या पातळीवर आणायचे असेल, तर चांदीचा भाव किमान दहा टक्के तरी वाढला पाहिजे किंवा सोन्याचा भाव पाच ते सहा टक्के कमी झाल पाहिजे. परंतु सध्या तरी सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता नाही, त्यामुळे चांदीचा भाव आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

सोने-चांदी हे नैसर्गिक धातू आहेत. त्यांची एखादी खाण मिळाली, तरी त्यातील सोने-चांदी व्यवहारात येण्यास किमान दहा वर्षे जातात. त्यामुळे आता खाण सापडली आहे, भाव कमी होतील असे होत नसते. त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी सोने-खरेदी केले जाते. तेव्हा ते दीर्घकाळ साठवले जाते. आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य असल्याने ते अगदी गरजेच्या प्रसंगीच विकले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते घरोघरी साठवले जाते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतो. आपल्या देशाला जेवढी सोन्याची गरज आहे, तेवढे सोने आपल्या देशात उपलब्ध नसते. त्यामुळे दरवर्षी आपल्याला सोने फार मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. परिणामी, आपल्या देशाची आयात-निर्यातीतील तफावत वाढते. परकीय चलन खर्च होते; हे देशाच्या अर्थकरणासाठी चांगले नसते.

चांदीचे भाव झपाट्याने वाढण्यामागे मोठे कारण आहे, ते म्हणजे चांदीचा औद्यागिक वापर वाढत आहे. तसेच ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. २०२३ पासून जगभरात चांदीच्या ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तिथे मागणी वाढली आहे. ‘ईटीएफ’मधील चांदी घेतली जाते आणि सुरक्षितपणे साठवली जाते. ती बाजारात येत नाही, त्यामुळे ‘ईटीएफ’मधील मागणी वाढेल, तसा चांदीचा भाव वाढेल. गुंतवणूक वाढली, तर ती चांदी साठविण्याचे प्रमाण वाढेल. त्या प्रमाणात पुरवठा कमी आहे, कारण उत्पादन कमी आहे.

सोन्याचा भाव गगनाला भिडत असल्याने आता कमी कॅरेटच्या सोन्यातील दागिन्यांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी ४० कॅरेटचे दागिने केले जात, मात्र कालांतराने २२ कॅरेट २० कॅरेटचे दागिने महिला विकत घेऊ लागल्या. हिरे किंवा इतर रत्नांसाठी १८ किंवा १४ कॅरेटचे सोने वापरले जाते, कारण रत्ने घट्टपणे धरून ठेवण्यासाठी कठीणपणा असणे महत्त्वाचे असते. आता सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नऊ कॅरेट सोन्यातील दागिन्यांना हॉलमार्किंगसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापार्यांकडून होत आहे. असे दागिने आपल्या देशात होतात; पण ते निर्यात केले जातात. नऊ कॅरेटच्या दागिन्यांचे ‘पॉलिश’ उच्च दर्जाचे असते. त्यामुळे हे दागिने उत्तम दिसतात व सोन्याचा भाव वाढला, तरी ग्राहकांना आपल्या आवडीनुसार दागिने खरेदी करता येतील. सोन्याला ‘रिसेल व्हॅल्यू’ असल्याने कॅरेट कितीही असले, तरी विकायला गेल्यास त्याचा योग्य भाव मिळणारच.

ईटीएफ-सोने चांदीत गुंतवणूक करण्यासाठी जोखीम घेऊ इच्छित नसलेल्या ग्राहकांकरिता ‘एक्सेंज ट्रेडर फंड’च्या म्हणजेच ‘ईटीएफ’चा पर्याय उपलब्ध आहे. सोने बाळगण्यात असणारी जोखीम व सुरक्षितता हे टाळायचे असल्यास ‘ईटीएफ’चा पर्याय उपलब्ध आहे. ‘ईटीएफ’मध्ये गुंतवूणक केल्यास ‘जीएसटी’ भरावा लागत नाही, पण दागिने बनवायचे असेल, तर ‘ईटीएफ’चा उपयोग नाही. ‘ईटीएफ’ फक्त गुंतवणुकीसाठी व सोनेखरेदी ही गुंतवणूक व दागिने दोन्हीसाठी!

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.