काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे ‘पाकिस्तान कनेक्शन’? - एसआयटी अहवाल आसामच्या मुख्यमंत्र्यांना सादर

    12-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली, आसाम सरकारच्या वतीने गठित केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या कथित पाकिस्तान कनेक्शनबाबतची चौकशी पूर्ण करून ९६ पानी अहवाल बुधवारी (१० सप्टेंबर) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना सादर केला. लोक सेवा भवन येथे एसआयटी सदस्य मुन्ना प्रसाद गुप्ता, रोजी कलिता, प्रणबज्योति गोस्वामी आणि मैत्रेयी देका यांच्या उपस्थितीत हा अहवाल सुपूर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री सर्मा यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली की, आसाम मंत्रिमंडळाने ‘भारतविरोधी कारवायां’ची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित केली होती आणि या तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. आसाम सरकारने पाक नागरिक अली तौकीर शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या भारतविरोधी कारवायांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली होती. या सखोल चौकशीत देशाच्या सार्वभौमत्वाला कमकुवत करण्याच्या मोठ्या कटाचा खुलासा झाला आहे.”


सर्मा यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने आसाममधील एका खासदाराच्या शेजारील देशातील प्रवासाला मदत केल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच एसआयटी च्या चौकशीत एका ब्रिटिश नागरिकाचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले असून, ती व्यक्ती एका भारतीय खासदाराची पत्नी आहे. या ब्रिटिश नागरिकाचे अली तौकीर शेखच्या कारवायांमध्ये थेट संबंध असल्याचे एसआयटीने नमूद केले आहे. सर्मा यांनी दावा केला की, गोगोई यांच्या कुटुंबातील चारपैकी तीन जणांकडे परदेशी नागरिकत्व आहे. आसाम सरकार एसआयटीचा अहवाल आता सविस्तर अभ्यासेल आणि तो राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. चर्चेनंतर चौकशीतील माहिती सार्वजनिक केली जाईल.

दरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मुख्यमंत्री सर्मा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.