नवी दिल्ली, बिहारमधील वोट अधिकार यात्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या आईविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी सुरू झालेल्या वादानंतर काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे बिहारचे राजकारण आणखी चिघळले आहे.
३६ सेकंदांच्या या एआय व्हिडिओमध्ये मोदींशी साधर्म्य असलेला एक व्यक्ती व त्यांची दिवंगत आई हीराबेन यांच्यासारखी दिसणारी महिला दाखवण्यात आली आहे. "साहेबांच्या स्वप्नात आली आई, पाहा रोचक संवाद," असा कॅप्शन देऊन गुरुवारी रात्री हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात दाखवण्यात आले आहे की पंतप्रधानांच्या स्वप्नात त्यांची आई येऊन विचारते की, "राजकारणासाठी अजून किती खालच्या पातळीवर जाशील?"
या व्हिडिओवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे म्हणणे आहे की, काँग्रेसने राजकीय चर्चेची पातळी घसरवून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर थेट टीका करताना म्हटले, "राहुल गांधी आता इतके खाली घसरले आहेत. त्यांना आईचीही त्यांना किंमत नाही. मग दुसऱ्यांच्या आईचा ते कसा सन्मान करतील? मोदीजींच्या आईवर एआय व्हिडिओ बनवणे ही गंभीर चूक आहे. या प्रकाराला सामाजिक व कायदेशीर शिक्षा व्हायला हवी. फ्रॉडचा गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे. सिंह पुढे म्हणाले की, राहुल गांधी हेच दाखवून देत आहेत की ते फसवे आणि भ्रष्ट मार्गाने वागणारे आहेत. हा अत्यंत दुर्दैवी दृष्टिकोन आहे आणि येत्या काळात काँग्रेसलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील.