दिल्ली पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांची धडक कारवाई; ५ दहशतवादी अटकेत, ‘कॉर्पोरेट मॉडेल’वर चालणारे मॉड्यूल उध्वस्त

    11-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी कट हाणून पाडला आहे. देशभरात राबवलेल्या संयुक्त कारवाईत दिल्ली, मध्यप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा येथून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दहशतवादी गटाचे कामकाज एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या पद्धतीने राबवले जात होते, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

या मॉड्यूलचा प्रमुख दानिश हा रसायनशास्त्रातील तज्ज्ञ मानला जातो. तो रासायनिक बॉम्ब बनवण्यात पारंगत असून त्याला ‘गजवा लीडर’ या कोड नावाने ओळखले जात होते. संघटनेत तो ‘सीईओ’ची भूमिका निभावत होता. इतर सदस्यांना टास्किंगनुसार स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवल्या जात होत्या. त्यात बॉम्ब तयार करणे, काडतुसे मिळवणे, लक्ष्यभेदी हत्या करणे अशा कामांचा समावेश होता. या मॉड्यूलचे सदस्य सोशल मीडिया व एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानातील हँडलर्सशी संपर्कात होते. तिथूनच तरुणांची भरती केली जात होती. या गटाचे मुख्य उद्दिष्ट ‘खिलाफत मॉडेल’ लागू करणे होते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी ताबा मिळवून तेथे जिहाद पसरवणे व भटकेले तरुण दहशतवादी कारवायांसाठी तयार करणे.
संयुक्त कारवाईदरम्यान मुंबईतील दोन संशयितांना निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरुन पकडण्यात आले. सुरुवातीला दिल्लीमधून अटक करण्यात आल्यानंतर इतर राज्यांमध्येही अनुक्रमे कारवाया करण्यात आल्या. या धाडीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य सापडले आहे. त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सल्फर पावडर, कॉपर शीट्स, बॉल बेअरिंग्ज, वायर्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचा समावेश आहे. याशिवाय दानिशकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण कटाला निधी हवालामार्गे पुरवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस आणि केंद्रीय यंत्रणा अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून या नेटवर्कचे आणखी धागेदोरे उलगडत आहेत.