पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’

    11-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून पंधरा दिवसांचा ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन देशभर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बंसल आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी दिली.

बंसल म्हणाले, पंतप्रधानांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वात मोठा उपक्रम रक्तदान शिबिरांचा असेल. त्याचबरोबर १७ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरेही घेण्यात येतील. लाखो लोकांना याचा लाभ मिळावा यासाठी भाजप प्रयत्नशील राहील. स्वच्छता अभियानाच्या संदर्भात बंसल यांनी सांगितले की, दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या उपक्रमात यंदा लोकसहभाग अधिकाधिक वाढवण्यावर भर असेल. रेल्वे स्थानके, बसस्थानके, शाळा, गल्ली-बोळ अशा अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांबरोबर नागरिकही सहभागी होतील.

याशिवाय, देशभरात विशेष प्रदर्शन भरवले जाणार असून, त्यात पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षांमध्ये देशसेवेसाठी केलेल्या कामांचा आढावा मांडला जाईल. या प्रदर्शनासोबतच ‘प्रबुद्ध संमेलन’ आयोजित केले जाईल. विज्ञान, कला, साहित्य, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांचा लाभ घेतला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना म्हटले की, मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान, संकटकाळात आणि आपत्तीच्या वेळी त्यांनी सेवाभावातून जनतेशी नाते जोडले. दुर्गम गावांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत स्वच्छ पाणी उपलब्ध झाले. पर्यावरण संवर्धनासाठी मोदींच्या संवेदनशीलतेमुळे भारत या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे.

यासाठी ६ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान मंडळस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. तसेच, संस्कृती मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘डिजिटल इंडिया’ ही प्रमुख विषयवस्तू असणार असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून तरुण पिढीला पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.