ट्रम्प यांची भारताला पुन्हा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’

    10-Sep-2025   
Total Views |
 
नवी दिल्ली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैत्रीचा संदेश पाठवला आहे. काही महिन्यांपूर्वी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादणारे आणि रशियाकडून तेल खरेदीवर सतत टीका करणारे ट्रंप आता भारत-अमेरिका संबंधांबाबत सकारात्मक सूर लावताना दिसत आहेत.

६ सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी भारत-अमेरिका संबंधांना “अत्यंत विशेष” असे संबोधले. “मी आणि पंतप्रधान मोदी कायमचे मित्र आहोत. चिंता करण्यासारखे काहीच नाही,” असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनीही यावर तत्काळ प्रतिसाद देत ट्रंप यांच्या भावना आणि संबंधांवरील सकारात्मक मूल्यांकनाचे मनापासून स्वागत केले. “भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे व्यापक, दूरदर्शी आणि जागतिक रणनीतिक भागीदारीचे उदाहरण आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

यानंतर केवळ चार दिवसांत म्हणजे १० सप्टेंबर रोजी ट्रंप यांनी दुसरा मैत्रीपूर्ण संदेश देत दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेचा उल्लेख केला. त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या माध्यमावर त्यांनी लिहिले की, “भारत आणि अमेरिका व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी सतत संवाद साधत आहेत. माझ्या अतिशय चांगल्या मित्र पंतप्रधान मोदींशी आगामी आठवड्यांत बोलण्यासाठी मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की आपल्या दोन्ही महान देशांसाठी यशस्वी तोडगा काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”

पंतप्रधान मोदी यांनी या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले, “भारत आणि अमेरिका हे घनिष्ठ मित्र व स्वाभाविक भागीदार आहेत. व्यापार चर्चा दोन्ही देशांच्या सहकार्याच्या अमर्याद शक्यता खुल्या करतील. आपल्या टीम्स या चर्चेला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. मी देखील राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे.”

दरम्यान, ट्रंप प्रशासनाने भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५० टक्के आयात शुल्कासोबत रशियन तेल खरेदीवर २५ टक्के अतिरिक्त दंड लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भाग घेताना ट्रंप यांना अप्रत्यक्ष कठोर संदेश दिला होता. मोदींच्या चीन दौर्‍यावरून परतल्यानंतर मात्र अमेरिकेकडून नरमाईचे संकेत दिसू लागले आहेत.

भारताने या संपूर्ण वादात कधीही माघार घेतलेली नाही. “भारतावर दबाव आणून काही साध्य होणार नाही” हा स्पष्ट संदेश दिला आहे. अमेरिकेलाही हे ठाऊक आहे की भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे आणि संरक्षण ते व्यापार अशा अनेक क्षेत्रांत तो नैसर्गिक भागीदार ठरू शकतो. म्हणूनच व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संदेशांमुळे भारत-अमेरिका व्यापार चर्चेबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले असून, आगामी आठवड्यांत या चर्चेत ठोस प्रगती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.