साताऱ्यातील जंगलांचा ‘ड्रोंगो’

    10-Sep-2025   
Total Views |

साताऱ्यातील जंगलांना जागतिक वारसास्थळ आणि संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी झटणारे निसर्गअभ्यासक सुनील हनुमंत भोईटे यांच्याविषयी...

सुनील यांचा जन्म दि. ४ जून १९७२ रोजी साताऱ्यातील कोंडवे या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावात पार पडले. त्यांना निसर्गसंस्कारचे बाळकडू मिळाले, ते आजीकडून. शेतावर किंवा रानावर जाताना, आजी लहानग्या सुनीलला सोबत घेऊन जात असे. शेतात काम कसे करावे, रानात कसे फिरावे, तिथल्या रंजक गोष्टी, तिथले नियम, जंगलात वावरण्याचा शिष्टाचार याचे धडे आजीने दिले. त्यांच्या गावातल्या शिवारातील दहिआंबा या ठिकाणावर जाण्यास, लहान मुलांना बंदी असे. आजीने बजावूनदेखील लहानग्या सुनीलने एकदा मनाशी ठरवून, आजीच्या नकळत दहिआंबा गाठला. त्याठिकाणी कठडा नसलेल्या विहिरीवर भलेमोठे आंब्याचे झाड कलंडले होते. परिणामी मुले विहिरीत पडण्याची भिती होती. तेथील धोक्याची जाणीव सुनील यांना, त्याठिकाणी गेल्यावर झाली. ही घटना त्यांच्यातील शोधक वृत्ती जागृत होण्यास कारक ठरली.

माध्यमिक शिक्षणाकरिता सुनील हे सातार्यात आले. शहरात आल्यामुळे, निसर्गाशी नाळ तुटण्याची भिती सुनील यांना वाटत होती. मात्र, इथे त्यांचे घर अजिंयताराच्या पायथ्याच्या जंगलाजवळच होते, तसेच घरापासून हाकेच्या अंतरावरच महादरेचे जंगल होते. मग काय, शनिवार-रविवारी त्यांचे महादरेच्या जंगलात फिरणे सुरू झाले. कास, महाबळेश्वर, चांदोली, कोयना, बामणोली हा भाग त्यांनी पिंजून काढला. कुवार जंगलातील जैवविविधतेचा अभ्यासही त्यांनी केला. यादरम्यान त्यांचे शिक्षण सुरूच होते. इतिहास आणि भूगोल या विषयातून दोन वेळा पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी शिवाजी विद्यापीठामधून ‘इन्व्हायर्नमेंटल सायन्स’ या विषयाचेही शिक्षण घेतले. त्यानंतर रुचीप्रमाणे रत्नागिरीतून मत्स्यविज्ञान शिक्षण घेतले. पत्रकारितेचेही शिक्षण घेतले. एकीकडे चरितार्थ सुरू होता मात्र, मन निसर्गात रमत होते. पुढे आवडींशी अनुकूल असणारा मित्रपरिवार सुनील यांच्याशी जोडत गेला आणि निसर्गासाठी काम करण्याची ऊर्मी अधिक बळकट झाली.

साधारण ९०च्या दशकात साताऱ्यात पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्था नव्हत्या. २००० सालच्या सुमारास त्यांना सातार्यापासून जवळच्या डोंगरावर वणवा दिसला. त्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसल्याचे जाणवल्यावर, सुनील आणि त्यांच्या मित्रांनी जाऊन तो वणवा विझवला. त्याचवेळी त्यांना संस्थेच्या माध्यमातून संघटित परिश्रमाची गरज जाणवली आणि त्यांनी मिळून ‘ड्रोंगो निसर्ग संरक्षण आणि संवर्धन संस्थे’ची स्थापना केली. पर्यावरण आणि वन्यजीवनांविषयी काम करणारी, ही सातार्यातील पहिली संस्था ठरली. ‘ड्रोंगो’ म्हणजेच कोतवाल हा पक्षी, जंगलाचा पहारेकरी म्हणून काम करतो. म्हणून ’जंगलाचा पहारेकरी’ याच संकल्पनेवर आधारित, त्यांनी संस्थेचे नामकरण या पक्ष्यावरून केले. ड्रोंगोच्या वृत्तीप्रमाणाचे संस्थने कामाला सुरुवात केली. २००३-०४ दरम्यान आलेला नवीन महाबळेश्वर गिरीस्थान विकास प्रकल्प आणि २००७ सालच्या सुमारास सातार्यात प्रस्तावित बॉसाईट खाण प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांना, सुनील आणि मंडळींनी कडाडून विरोध केला. परिणामी, महाबळेश्वर प्रकल्पाला तसेच बॉसाईट खाणीच्या कंपनीला सातार्यातून माघार घ्यावी लागली ती कायमचीच.

२००९ सालच्या सुमारास सुनील यांनी साताऱ्यातील कोयनेच्या जंगलातून वाघाचा छायाचित्रित पुरावा मिळवला. त्यानंतर या संपूर्ण परिसराला ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ घोषित करण्याची एक मोहीम सुरू झाली. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या प्रस्ताव समितीचे ते एक सदस्य होते. त्यापुढे जाऊन कोयना-चांदोली-कास या परिसराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यासाठी, प्रा. डॉ. जय सामंत व प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या प्रस्ताव समितीचेदेखील ते सदस्य होते. या प्रस्तावाची तपासणी करून या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या परदेशातील संशोधकांसोबत त्यांनी, या संपूर्ण परिसराचा तीन आठवड्यांचा दौरा केला. त्यानंतर २०११ साली या प्रदेशाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. कास पठाराला घातलेल्या कुंपणालादेखील सुनील यांनी कडाडून विरोध केला.

२०१७ साली त्यांनी प्रा. डॉ. नेहा बेंद्रे, आणि प्रा. डॉ. प्रतिमा पवार यांच्या सहकार्याने, ‘महादरे रिसर्च ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘मेरी’ या संस्थेची स्थापना केली. सद्यस्थितीत या संस्थेचे सर्व काम ते स्वतःच पाहात आहेत. मुलांमधील संशोधनाच्या वृत्तीला चालना देण्यासाठी, त्यांनी ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना विविध पर्यावरणीय विषयांवर नि:शुल्क काम करता येते. तसेच या संशोधनासाठी वेगवेगळ्या संस्थांकडून निधी आणला जातो. याच युवा संशोधकांच्या माध्यमातून सुनील यांनी, महादरेच्या जंगलात फिरून फुलपाखरांवर केलेला कित्येक वर्षांचा अभ्यास ’संवर्धन राखीव’च्या माध्यमातून सार्थकी लावला. २०१७ साली त्यांनी महादरेच्या जंगलाला ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’चा दर्जा देण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला, जो २०२२ मध्ये मान्य झाला आणि महादरे हे देशातील पहिले ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ क्षेत्र ठरले. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मायनी परिसराचा ‘संवर्धन राखीव’ करण्याचा त्यांचा प्रस्तावदेखील शासनाने मान्य करून, हे क्षेत्र संरक्षित केले. ‘मेरी’ संस्थेतील गायत्री पवार या सध्या कास पठारावरील कीटक समूहांचा अभ्यास करत आहेत, तर ओंकार ढाले उभयचर व सरपटणारे प्राणी, प्रिया पाटील या पक्षीविज्ञान अभ्यासत आहेत. तर संस्थेतील आकाश कदम हे सध्या देहरादून ते आयएफएससी नियुक्तीवर प्रशिक्षण घेत आहेत. यश पाटील हे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग’मध्ये शिक्षण घेत आहेत. अशा विविध क्षेत्रांत संस्थेतील मुलांची वाटचाल सुरू आहे.

सध्या सुनील संस्थेच्या मुलांबरोबर मिळून, चाळकेवाडीच्या पठारावरील गोड्या पाण्यातील खेकडे आणि जिल्ह्यातील देवडोहांवर काम करत आहेत. मायनी व महादरे संवर्धन राखीव आणि कोयना-चांदोली-कासला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर ज्या वसुंधरेच्या संसाधनाचा मी वापर करत आहे, त्याची परतफेड केल्याची भावना ते व्यक्त करतात. पुढील वाटचालीकरिता सुनील यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.