दि. १५ ऑगस्ट २०२५ या दिवशी ‘शोले’ या भव्य हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला, ५० वर्षे पूर्ण होत आहेत. दि. २ ऑक्टोबर २०२५ या दिवशी विजयादशमी आहे, त्यादिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने हिंदू समाजाच्या मानसिकतेबद्दल एक चिंतन...
सेव्हन सामुराई अकीरा कुरोसावा हा एक ख्यातनाम जपानी चित्रपट दिग्दर्शक होऊन गेला. १९५४ साली त्याने ‘सेव्हन सामुराई’ नावाचा चित्रपट, जपानी भाषेत काढला. सामुराई म्हणजे तलवारबाज योेद्धा. कथानक इतिहास काळातले आहे. दरोडेखोरांची एक टोळी एका जपानी खेड्यातले सगळे पीक लुटून नेत असते. गावकरी त्यांना रोखू शकत नसतात. मग एका अनुभवी म्हातार्याच्या सल्ल्यावरून, ते एका सामुराई योद्धाला आपल्या संरक्षणासाठी गावात बोलावून आणतात. हा सामुराई आणखी सहा सामुराईंना घेऊन येतो. पुढे काय होते, हे आपल्याला कळलेच असेल. यातला अधोरेखित करण्याचा मुद्दा हा की, हे सामुराई लोक गावातल्या दरिद्री, साध्या शेतकर्यांना दरोडेखोरांशी लढण्यासाठी प्रशिक्षण देऊन तयार करतात. म्हणजे सात सामुराईंच्या नेतृत्वाखाली अख्खा गाव डाकूंशी लढतो.
कुरोसावाचे नाव १९५०च्या त्याच्या ‘राशोमॉन’ या यशस्वी चित्रपटामुळे, जगभर सर्वत्र पोहोचलेले होतेच. त्यामुळे जपानसकट जगभर सर्वत्र हा ‘सेव्हन सामुराई’ उत्सुकतेने पाहिला गेला. जपानमध्ये आणि इतरत्रही तो समीक्षकांना पण आवडला आणि तिकीट बारीवरही यशस्वी ठरला.
मॅग्निफिसंट सेव्हन आता इतका यशस्वी चित्रपट म्हटल्यावर हॉलीवूडवाल्यांनी तो न उचलला, तरच नवल! ‘युनायटेड आर्टिस्ट्स’ या हॉलीवूड कंपनीसाठी दिग्दर्शक जॉन स्टर्जेस याने ‘मॉग्निफिसंट सेव्हन’ या नावाने, ‘सेव्हन सामुराई’चे खास अमेरिकन रूपांतर केले. अमेरिकेतली टेक्सास, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया इत्यादी संस्थाने, ‘वाईल्ड वेस्ट’ म्हणजे ‘रांगडी पश्चिम’ म्हणून ओळखली जात. चोर्यामार्या, गुंडगिरी, तुफानी घोडेस्वारी, बेछूट गोळीबार, जुगार इत्यादी गोष्टी, तिथल्या अफाट मुलखात सर्रास चालायच्या.
तर अशीच एक डाकूंची टोळी, मेक्सिकोमधल्या एका गरीब शेतकरी खेड्याला वारंवार त्रास देत असते. तेव्हा गावातल्या म्हातार्याच्या सांगण्यानुसार काहीजण, मेक्सिको आणि अमेरिकेच्या सरहद्दीवरच्या एका गावात जातात. तिथे त्यांना दोन उत्कृष्ट नेमबाज भेटतात. गावकरी त्यांच्याकडून हत्यारे विकत घेऊ पाहतात. तेव्हा ते नेमबाज म्हणतात, "हत्यारांपेक्षा अमेरिकेत हत्यारबंद माणसे स्वस्त आहेत. तेव्हा आम्हीच तुमच्या गावात भाड्याने येतो.” हा खास अमेरिकन टच् होता.
मग ते दोन नेमबाज म्हणजे, १९५० आणि ६०च्या दशकातले हॉलीवूडचे दोन सुपरस्टार अभिनेते युल ब्रायनर आणि स्टीव्ह मॅक्क्वीन! ते आपल्यासारख्या आणखी पाच नेमबाजांना बरोबर घेऊन, त्या संकटग्रस्त गावात जातात. पुढचा अधोरेखित करण्याचा मुद्दा हा की, ते गावातल्या गरीब, साध्या शेतकर्यांना प्रशिक्षण देऊन तयार करतात. डाकूंसोबतच्या अंतिम सामन्यात, या सात नेमबाजांबरोबरच गावसुद्धा लढतो. ‘मॅग्निफिसंट सेव्हन’ १९६० साली प्रदर्शित झाला.
जिस देश में गंगा...त्याचवर्षी म्हणजे १९६० साली भारतात, राज कपूरने ‘जिस देश में गंगा बहती हैं’ हा चित्रपट काढला. त्यात तो स्वतःच नायक होता. तो नेहरू युगाचा परमोच्च कालखंड असल्यामुळे, शस्त्राने दुष्टांचे निर्दालन वगैरे होतच नसे. प्रेम, अहिंसा, शांती, सद्भाव, यांच्याबद्दलची राज कपूरची प्रवचने ऐकूनच डाकूंचे हृदयपरिवर्तन होते, असे दाखवण्यात आले. शेकडो बंदुका जे करू शकत नाहीत, ते एकटा राज कपूर हा हा म्हणता करून टाकतो. जोडीला शंकर-जयकिशनची मधुर गाणी, पद्मिनी या तत्कालीन लोकप्रिय नटीची दिलखेचक नृत्ये वगैरेंनी, हिंसाचारी ‘सेव्हन सामुराई’ला अहिंसेच्या गोड गोड पाकात बुडवून पार अहिंसक बनवून सोडले. कसेही असो, चित्रपट तिकीट बारीवर हिट झाला.
मेरा गाव मेरा देश १९७१ साली राज खोसला या प्रसिद्ध दिग्दर्शकाने, याच कथानकावर ‘मेरा गाव मेरा देश’ हा चित्रपट काढला. त्या काळात हिंदी चित्रपटात एकच नायक असायचा. एक निवृत्त सेनाधिकारी (अभिनेता जयंत) एका चोराला (अभिनेता धर्मेंद्र) आपल्या गावात आणतो आणि गावाला सतावणार्या डाकूंशी लढण्यासाठी तयार करतो. धर्मेंद्र हे काम मनावर घेऊन करू लागल्यामुळे, गावकरी आपोआपच त्याच्यामागे उभे राहतात.
शेवटच्या संघर्षात दिग्दर्शकाने काही फार मजेदार दृश्ये दाखवली आहेत. गावातल्या महिला धमेंद्रला खूप मदत करतात. एक महिला घरात येऊन बघते, तर तिचा नवरा बाहेरच्या मारामारीत घुसण्याऐवजी भाकरी खात बसलेला तिला दिसतो. काहीही न बोलता ती बाई, आपल्या हातातल्या बांगड्या काढून नवर्यासमोर धरते. चिडलेला नवरा मुकाट्याने थाळी दूर सारतो आणि लाठी घेऊन बाहेर पडतो. मुद्दा काय की, नायक एकटाच न लढता, लोकांना बरोबर घेऊन खलनायकाशी लढतो.
शोलेमला वाटते की, हा लेख वाचणार्या सर्व वाचकांनी ‘शोले’ हा चित्रपट नक्कीच पाहिला असावा. तरी थोडक्यात कथानक सांगतो. डाकू गब्बरसिंग (अभिनेता अमजद खान) याला, ठाकूर बलदेवसिंग (अभिनेता संजीव कुमार) हा बहाद्दर इन्स्पेक्टर पकडतो. गब्बर सूड म्हणून ठाकूरच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल करतो आणि ठाकूरचे दोन्ही हात तोडून टाकतो. ठाकूर वीरू (धर्मेंद्र) आणि जय (अमिताभ) या दोन गुंडांना पैसे देऊन गावात आणतो आणि गब्बरचा नुसत्या पायांनी चेचून सूड घेतो.
दि. १५ ऑगस्ट १९७९ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ने, हिंदी चित्रपत्रसृष्टीत नवा इतिहास रचला. पाच वर्षे हा चित्रपट अखंड गर्दी खेचत होता. ‘शोले’च्या विविध वैशिष्ट्यांवर नामवंत चित्रपट समीक्षकांनी भरभरून लिहिले आहे आणि आता ५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने पुन्हा लिहिले जाईल.
मला जो मुद्दा अधोरेखित करायचा आहे तो असा की, मूळ ‘सेव्हन सामुराई’पासून पुढच्या मी दिलेल्या त्याच्या कॉप्यांमध्ये किंवा मी इथे उल्लेख न केलेल्या कॉप्यांमध्येसुद्धा, लढणार्या एक किंवा अनेक नायकांसह त्या गावातल्या स्थानिक लोकांचा सहभाग दाखवला गेला. ‘शोले’मध्ये मात्र लोक सहभाग नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत, वीरू आणि जय हे दोघेच फक्त खलनायकाशी टक्कर घेतात. शेवटच्या क्लायमॅक्समध्ये तर एकटा ठाकूरच गब्बरशी झुंजतो. सगळे गावकरी मिळून लढतायत, असे एकही दृष्य नाही.
भारतीय लोकांची म्हणजे हिंदू समाजाची अशी मानसिकता आहे की, आम्ही संकटात आहोत; पण आम्ही त्यासाठी काहीही करणार नाही. कुणीतरी अवतार, कुणीतरी मसीहा येईल, तो आम्हाला दुष्टांच्या तावडीतून सोडवेल. मग आम्ही त्याच्या आरत्या गाऊ, त्याच्या पायावर लोटांगणे घालू. ‘शोले’चे लेखक सलीम-जावेद यांनी, हिंदू समाजाच्या या मानसिकतेवरच बोट ठेवले आहे का? जर असेल, तर कळत की नकळत?
गावातल्या रहीम चाचाचा (अभिनेता ए. के. हंगल) मुलगा अहमद (सचिन) याला गब्बर ठार मारून गावात पाठवून देतो आणि मागणी करतो की, गाव शिल्लक राहायला हवा असेल, तर वीरू आणि जय यांना माझ्या स्वाधीन करा. त्यावर सगळे हिंदू गाववाले शेपूट घालतात पण, रहीम चाचा म्हणतो, "अल्लाने मला आणखी दोन-चार मुलगे का नाही दिले? या गावावर न्योछावर व्हायला?” या प्रसंगातून सलीम-जावेद यांनी कोणता नॅरेटिव्ह सेट केला?
संघ
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी, हिंदू समाजाच्या या अवतार संकल्पनेवरच नेमके बोट ठेवले होते. परमेश्वर अवतार घेऊन येईल आणि दुष्टांचे निर्दालन करून पुन्हा धर्मसंस्थापना करेल, या धोरणेला त्यांचा सक्त विरोध होता. म्हणजे त्यांचा परमेश्वरी शक्तीवर विश्वास नव्हता, असे नव्हे; तर सर्व काही परमेश्वर करेल, आम्ही झोपून राहू आणि दुष्टांकडून मार खात राहू, या हिंदू समाजाच्या भ्रांत धारणेला, निष्क्रियतेला त्यांचा विरोध होता. त्यासाठी त्यांनी संघटना आणि शक्तीची उपासना यांची सुरुवात केली.
एका काल्पनिक भासणार्या चित्रपट कथेचा, हिंदू समाजाच्या जुन्या दुखण्याशी असा प्रत्यक्ष संबंध आहे. या चित्रपटाला त्याच्या यशाला ५० वर्षे होत आहेत आणि त्या जुनाट दुखण्यावरच्या उपायाला १०० वर्षे होत आहेत. तुम्हाला काय वाटते? कुणीतरी महानायक येईल नि आमचे संकट दूर करेल. तोपर्यंत आम्ही असेच असंघटित, ख्यालीखुशालीत मग्न राहू, ही हिंदू समाजाची मानसिकता बदलली आहे?