राहुल गांधींचे नैराश्य टोकाला – भाजपचे संबित पात्रा यांचा टोला ; राहुल गांधींचा विशिष्ट एनजीओकडून वापर – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

    07-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  निवडणूक आयोगावर केवळ आरोप करणारे राहुल गांधी पुरावे देणे आणि न्यायालयात जाण्यापासून पळ काढतात. नकली गांधी कुटुंबाचे सदस्य असलेल्या राहुल गांधी यांना सततच्या पराभवामुळे नैराश्य आले असून त्याने आता टोक गाठले आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’ आरोपास भाजपतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेस हिमाचल, तेलंगणा आदी राज्यांमध्ये विजय मिळाला आहे. त्यामुळे त्या राज्याच्या विधानसभा निवडणुंकावर प्रश्न न विचारून त्यांची सोयीस्कर राजकीय भूमिका स्पष्ट होते. एकीकडे निवडणूक आयोगावर नियंत्रण असल्याचा आरोप करायचा आणि त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत ९९ जागा प्राप्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दुटप्पीपणा काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. सततच्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या नैराश्याने आता टोक गाठले आहे. त्यातूनच त्यांनी निवडणूक आयोगाने आपल्या आरोपांना उत्तर न दिल्यास त्याचे अतिशय घातक परिणाम होतील आणि अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही; अशी रस्त्यावरील भांडणाची भाषा वापरली असल्याचा टोला पात्रा यांनी लगावला.

निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर ते प्रतिज्ञापत्रावर देणे ही चौकशीची प्रक्रिया असल्याचे पात्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आपण कोणतेही प्रतिज्ञापत्र देणार नसून आपले शब्द हिच शपथ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, देशात नकली गांधी कुटुंबाचे नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शासन असल्याचे राहुल गांधी यांनी विसरू नये. जनसंघ – भाजप हे सर्वाधिक काळ विरोधात बसलेले पक्ष आहेत. मात्र, आमच्याकडून कधीही निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांना लक्ष्य करण्यात आले नसल्याचेही पात्रा यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्रात तुमचे बीएलए काय करत होते ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर तुमच्या पक्षाचे बीएलए काय करत होते, असा सवाल पात्रा यांनी विचारला. ते म्हणाले,

· महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जर मतांची चोरी झाली असेल तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते न्यायालयात का गेले नाहीत ?

· काँग्रेस पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयात प्रॉक्सी पाठवण्यात आले. मात्र, न्यायालयाने “निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्याचे दिसत नाही” असे सांगून याचिका फेटाळून लावल्या आहेत.

· महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयी आक्षेप असल्यास त्यावर वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिण्यापेक्षा आमच्याकडे पुरावे घेऊन चर्चेसाठी या, हे निवडणूक आयोगाचे निमंत्रण का फेटाळला, याचे उत्तर द्यावे.

· महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांचे एकूण १ लाख ८२० बीएलए (पक्ष प्रतिनिधी) आहेत. त्यापैकी २८ हजार ४२० बीएलए काँग्रेस पक्षाचे आहेत. कथितरित्या गैरप्रकार होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने असलेले बीएलएल काय करत होते, असाही सवाल पात्रा यांनी विचारला.

राहुल गांधींचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही – किरेन रिजिजू, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री

राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोगावर निशाणा साधत आहेत. असे करून ते लोकशाहीवर हल्ला करत आहेत. त्यांनी एका एनजीओचे सादरीकरण आणले. एक एनजीओ असून ती राहुल गांधींना असे मुद्दे बोलण्यास वारंवार भाग पाडते. मात्र, त्यांना स्वतःला माहित नाही की ते काय बोलत राहतात. जेव्हा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत यश मिळाले, तेव्हा ते त्याच मतदार यादीचे कौतुक करत होते आणि जेव्हा ते विधानसभा निवडणुकीत पराभव तेव्हा यादीवर टिका सुरू झाली.