नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर अवाजवी कर लादला असून आमच्या राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे प्रत्युत्तर भारताने अमेरिकेस दिले आहे.
भारताच्या ठाम भूमिकेमुळे वैतागलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आयात करण्याच्या कारणावरून भारतावर आणखी २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली असून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
भारताने स्पष्ट केले की, रशियातून तेल आयात ही संपूर्णपणे आंतरराष्ट्रीयबाजारातील घडामोडींवर आधारित आहे आणि १४० कोटी भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देश आपापल्या हितासाठी अशाच प्रकारची आयात करत आहेत. मात्र केवळ भारतास लक्ष्य करून अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लावणे अत्यंत दुर्दैवी आहे. भारताने अमेरिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत हे शुल्क अनुचित आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय हितसंरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील."
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावरील एकूण कर आता ५० टक्के झाला आहे. नियमांनुसार, नवीन टॅरिफ दर घोषणेनंतर २१ दिवसांनी लागू होतील, म्हणजेच वाढलेले टॅरिफ दर २१ ऑगस्टपासून भारतावर लागू होतील.