नव्या कर्तव्य भवनांतून होणार विकसित भारताचा प्रवास – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    06-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : कर्तव्यपथावरील या नव्या कर्तव्य भवनांमधूनच आता नव्या भारताची विकासयात्रा लिहिली जाणार आहे. त्यामुळे या केवळ वास्तू नसून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने साकारण्याचती तपोभूमी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या कार्यालयांसाठीच्या कर्तव्य भवनल ३ च्या वास्तूचे राष्ट्रार्पण बुधवारी दुपारी झाले. त्यानंतर सायंकाळी पंतप्रधानांनी कर्तव्य पथावरून देशास संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, देशाच्या राजधानीमध्ये विविध मंत्रालयांसाठी उभारण्यात आलेले कर्तव्य भवन हे नव्या भारताचे मानचिन्ह आहे. ही केवळ वास्तू नसून कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांची तपोभूमी ठरणार आहे. कर्तव्य पथावरील हे कर्तव्य भवन भारताची लोकशाही आणि राज्यघटनेच्या मूळ भावनेचा उद्घोष ठरणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कर्तव्य हा शब्द केवळ जबाबदारी एवढाच मर्यादित नसून तो भारताच्या कर्मप्रधान संस्कृतीची भावना आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.

अमृत काळात कर्तव्य भवनाची निर्मिती झाली असून त्यातूनच आता विकसित भारताची यात्रा सुरू होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या वास्तू आता राष्ट्रास दिशा देणार आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके ब्रिटीशकालीन इमारतींमधूनच सुरू आहे. देशाच्या गृह मंत्रालयासारख्या अतिशय महत्त्वाच्या मंत्रालयासही अपुऱ्या सुविधांनिशी १०० वर्षे जुन्याच वास्तूमधून काम करावे लागले. त्याचप्रमाणे अनेक मंत्रालये तर दिल्लीत विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतींमधून चालवावी लागत होती. त्यामुळे भाड्यापोटी दरवर्षी सुमारे दिड हजार कोटी रुपये खर्च येत असे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे विविध मंत्रालयामध्ये जाणे, त्यासाठी खर्च होणारा वेळ, वाहनांचा वापर आणि त्यामुळे होणारी वाहतुकी कोंडी यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. आता मात्र कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून प्रशासन अधिक लोककेंद्रीत होईल, असाही विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

असे आहे नवे कर्तव्य भवन ३

कर्तव्य भवन-०३ हे केंद्र सरकारच्या दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरेखित केलेले आहे. हे सुमारे १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले एक अत्याधुनिक कार्यालय संकुल असेल आणि त्यात दोन तळघरे आणि सात मजले (तळमजला + ६ मजले) असतील. यात गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांची कार्यालये असतील.

आधुनिक सुविधांनी युक्त

· नवीन इमारतीमध्ये आधुनिक प्रशासकीय रचना असेल ज्यामध्ये आयटी-सक्षम आणि सुरक्षित कार्यस्थळे, ओळखपत्र-आधारित प्रवेश नियंत्रण, एकात्मिक इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि केंद्रीकृत कमांड सिस्टम यांचा समावेश असेल.

· ही इमारत शाश्वततेमध्ये देखील आघाडीवर असेल आणि डबल-ग्लेझ्ड दर्शनी भाग, छतावरील सौरऊर्जा यंत्रणा, प्रगत एचव्हीएसी (हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली आणि पावसाच्या पाण्याचे संचयन यासह ग्रिहा-४ रेटिंग मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

· ही सुविधा शून्य-विसर्जन कचरा व्यवस्थापन, अंतर्गत घनकचरा प्रक्रिया, ई-वाहन चार्जिंग स्टेशन आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या बांधकाम साहित्याचा व्यापक वापर याद्वारे पर्यावरण-जागरूकता वाढवेल.

· कर्तव्य भवन-03 च्या छतावरील सौर पॅनेल दरवर्षी 5.34 लाख युनिटपेक्षा जास्त वीज निर्माण करतील.