
दोडामार्ग तालुयातील जैवविविधतेचा पट लोकांसमोर उलगडवून, त्याद्वारे करिअरची वेगळी वाट चोखळणार्या मकरंद तुळशीदास नाईक याच्याविषयी...ग्रामीण भागात राहून किंवा योग्य शिक्षण न घेतल्यास करिअर घडत नाही, अशा बाबींना फाटा देणारा हा मुलगा. शिक्षणाला कौशल्याची जोड असल्यास अगदी ग्रामीण भागात राहून तिथली जैवविविधता उलगडवून अर्थार्जन करता येते, याची प्रचिती देणारा. वन्यजीवांच्या अनुषंगाने सिंधुदुर्गाकरिता काही महत्त्वपूर्ण नोंदी करणारा हा मुलगा म्हणजे मकरंद नाईक.
मकरंदचा जन्म दि. २० जुलै १९९६ रोजी दोडामार्ग तालुयातील भेडशी या ग्रामीण भागात झाला. प्राथमिक शिक्षण हे साटेली-भेडशीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याचे वडील तुळशीदास नाईक हे पेशाने पत्रकार. त्यामुळे वडील वार्तांकनासाठी कुठे गेल्यावर ते लहानग्या मकरंदला काहीवेळा सोबत घेऊन जात. असेच एकदा दोडामार्गातील एका गावातील विहिरीत वाघाचा बछडा पडला होता. या घटनेच्या वार्तांकनासाठी जाताना नाईक मकरंदला सोबत घेऊन गेले. त्यावेळी मकरंदचे वय होते साधारण चार वर्षे. त्या वयात मकरंदने विहिरीत पडलेल्या वाघाचे बचावकार्य ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. वाघाच्या पिल्लाला पाहून मनात वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण झाले. या कुतूहलाचे रूपांतर पुढे आवडीत रूपांतर होईल, याची पुसटशीही कल्पना त्याला नव्हती.
वडिलांच्या पत्रकारितेमुळे घरात एक कॅमेरा होता. हा कॅमेरा घेऊन त्याने जंगलाच्या वाटा तुडवण्यास सुरुवात केली. जंगलाच्या वाटेवर भेटणार्या फुलपाखरांना, पक्ष्यांना इतर छोट्या-मोठ्या कीटकांना त्याने कॅमेर्यात कैद करण्यास सुरुवात केली. यामुळे हळूहळू त्याचा कल छायाचित्रणाकडेही वळू लागला. टिपलेले फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. टिपलेला पक्षी किंवा फुलपाखरू नेमके कोणते, त्याचे नाव काय, याचा ठावठिकाणा माहीत नव्हता. त्याची केवळ स्थानिक नावे पाठ. त्यामुळे समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहून तज्ज्ञ मंडळी त्यावर प्रतिक्रिया देत त्याची ओळख सांगू लागले. असेच एकदा दहावी इयत्तेत असताना ‘मलबारी कर्णा’ या पक्ष्याचे छायाचित्र मकरंदने टिपले आणि नेहमीप्रमाणे ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. मकरंदने ‘मलबारी कर्णा’ पक्ष्याची केलेली ही नोंद सिंधुदुर्गातील या पक्ष्याची पहिली नोंद होती, याची कल्पनाही त्याला नव्हती. या छायाचित्रामुळे सिंधुदुर्गातील अनेक पक्षीनिरीक्षकांची पाऊले दोडामार्ग आणि खासकरून तिलारीकडे वळली. मकरंदने या तज्ज्ञांना हा पक्षी जंगलात नेऊन दाखवला. त्यानिमित्ताने मार्गदर्शन मिळाले आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
पुढच्या प्रवासात मकरंदने पक्ष्यांची नावे अवगत करून घेण्यास सुरुवात केली. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवून त्याने पक्ष्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. या काळात त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले होते. पण, वन्यजीव क्षेत्रात काम करायचे असल्यास विज्ञान शाखेतून शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्याचे पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण वाणिज्य शाखेतून झाले. मात्र, काळात त्याला वन्यजीव क्षेत्राची आवडदेखील निर्माण झाली होती आणि तुटपुंजे ज्ञानदेखील मिळाले होते. त्यामुळे सिंधुदुर्गात होणारे ‘फुलपाखरू महोत्सव’ म्हणा किंवा पक्षी बैठका म्हणा, अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याने मार्गदर्शन मिळविण्यास सुरुवात केली होती. पुढे दोडामार्गात ‘वानोशी फोरेस्ट होम-स्टे’च्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळी प्रवीण देसाई, रमण कुलकर्णी यांच्याकडून त्याला ‘नॅचरलिस्ट’ किंवा ‘गाईड’ या संकल्पनेची माहिती मिळाली. ‘होम-स्टे’मध्ये राहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना जंगल फिरवणार्या माणसाला ‘नॅचरलिस्ट’ म्हणतात, याची जाणीव त्याला झाली. देसाई आणि कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे त्याने ‘होम-स्टे’मध्ये आलेल्या पाहुण्यांना जंगल फिरवण्यास सुरुवात केली. त्यातून त्याचे अर्थार्जनदेखील झाले. पुढे सह्याद्रीतील व्याघ्र अधिवासावर काम करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्यासोबतदेखील त्याला काम करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याला वन्यजीवांसाठी कॅमेरा ट्रपिंग कशी करावी, अशा वन्यजीव संशोधनातील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन मिळाले.
सध्या मकरंद स्वतंत्र ‘नॅचरलिस्ट’ म्हणून दोडामार्ग तालुयात काम करत आहे. शिवाय छायाचित्रणाची आवड असल्याने व्यावसायिक छायाचित्रकार आणि ड्रोनचालक म्हणूनही काम कार्यरत आहेत. गेल्या काही काळात मकरंदने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. ‘मलबार ट्री टोड’ हा बेडूक त्यापैकीच एक, महाराष्ट्रात केवळ तिलारीच्या खोर्यात सापडणार्या या बेडकाची नोंद मकरंद दरवर्षी नित्यनियमाने करतात. ‘फ्लाईंग लिझर्ड’ म्हणजेच उडणारा सरडा या प्रजातीची महाराष्ट्रातील पहिली नोंददेखील मकरंदने केली आहे. ग्रामीण भागात राहूनही तिथल्या जैवविविधतेचे दर्शन घडवत त्याद्वारे अर्थार्जन करणार्या मकरंद याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!