पंतप्रधान उद्या करणार ‘कर्तव्य भवन- ३’ चे राष्ट्रार्पण

    05-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:१५ वाजता दिल्लीतील कर्तव्यपथ येथील कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सायंकाळी ६:३० वाजता कर्तव्यपथ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.

उद्घाटन होत असलेले कर्तव्य भवन-३ हे सेंट्रल व्हिस्टाच्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रशासन सक्षम करण्यासाठी येणाऱ्या अनेक आगामी कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट इमारतींपैकी हे पहिले आहे. हा प्रकल्प सरकारच्या व्यापक प्रशासकीय सुधारणा अजेंडाचे प्रतीक आहे. मंत्रालये एकत्रित करून आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा अवलंब करून, कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट आंतर-मंत्रालयीन समन्वय सुधारेल, धोरण अंमलबजावणीला गती देईल आणि प्रतिसादात्मक प्रशासकीय परिसंस्थेला प्रोत्साहन देईल.

कर्तव्य भवन-०३ हे केंद्र सरकारच्या दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरेखित केलेले आहे. हे सुमारे १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले एक अत्याधुनिक कार्यालय संकुल असेल आणि त्यात दोन तळघरे आणि सात मजले (तळमजला + ६ मजले) असतील. यात गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांची कार्यालये असतील.

कर्तव्य भवनामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर व्यवस्था आहे. त्यात अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रणाली देखील समाविष्ट आहे. इमारत 30 टक्के कमी ऊर्जा वापरण्यासाठी आरेखित केलेली आहे. इमारत थंड ठेवण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष काचेच्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. ऊर्जा-बचत करणारे एलईडी दिवे, गरज नसताना दिवे बंद करण्यासाठी सेन्सर, वीज-बचत करणारे स्मार्ट लिफ्ट आणि वीज वापर व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रगत प्रणाली हे सर्व ऊर्जा वाचविण्यास मदत करतील. कर्तव्य भवन-03 च्या छतावरील सौर पॅनेल दरवर्षी 5.34 लाख युनिटपेक्षा जास्त वीज निर्माण करतील. सौर वॉटर हीटर दैनंदिन गरम पाण्याच्या गरजेच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त गरज पूर्ण करतील. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध असतील.

आधुनिक प्रशासकीय इमारतीचे प्रतिक

नवीन इमारतीमध्ये आधुनिक प्रशासकीय रचना असेल ज्यामध्ये आयटी-सक्षम आणि सुरक्षित कार्यस्थळे, ओळखपत्र-आधारित प्रवेश नियंत्रण, एकात्मिक इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि केंद्रीकृत कमांड सिस्टम यांचा समावेश असेल. ही इमारत शाश्वततेमध्ये देखील आघाडीवर असेल आणि डबल-ग्लेझ्ड दर्शनी भाग, छतावरील सौरऊर्जा यंत्रणा, प्रगत एचव्हीएसी (हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली आणि पावसाच्या पाण्याचे संचयन यासह ग्रिहा-४ रेटिंग मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. ही सुविधा शून्य-विसर्जन कचरा व्यवस्थापन, अंतर्गत घनकचरा प्रक्रिया, ई-वाहन चार्जिंग स्टेशन आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या बांधकाम साहित्याचा व्यापक वापर याद्वारे पर्यावरण-जागरूकता वाढवेल.

म्हणून नव्या इमारतीची गरज

सध्या अनेक प्रमुख मंत्रालये १९५० ते १९७० च्या दशकात बांधलेल्या शास्त्री भवन, कृषी भवन, उद्योग भवन आणि निर्माण भवन यासारख्या जुन्या इमारतींमधून कार्यरत आहेत, ज्या आता संरचनात्मकदृष्ट्या जुन्या आणि अकार्यक्षम आहेत. या नवीन इमारती दुरुस्ती आणि देखभाल खर्च कमी करतील, उत्पादकता वाढवतील, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि एकूण सेवा वितरण सुधारतील.