नवी दिल्ली, उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीत पूर आला. पुरामुळे मोठे नुकसान झाले. अनेक हॉटेल्स आणि घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि अनेक लोक बेपत्ता असून मदतकार्य सुरू आहे.
मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली या उंचावरील गावामध्ये ढगफुटीमुळे अचानक पूर आला, ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, कित्येक घरे वाहून गेली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ढगफुटी खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झाली, ज्यामुळे विनाशकारी पूर आला. या आपत्तीमुळे पाणी आणि ढिगाऱ्यांचा पूर आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तत्काळ मदतकार्यास प्रारंभ केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आढावा घेत असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या ते संपर्कात आहेत.
तातडीने कारवाई करत, भारतीय लष्कराने १५० जवान तैनात केले जे १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत १५-२० लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे आणि जखमींना हर्षिल येथील भारतीय लष्कराच्या वैद्यकीय केंद्रात त्वरित वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे आणि अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर केला जात आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि भारतीय लष्कर बाधित नागरिकांना सर्व शक्य ती मदत पुरवण्यासाठी काम करत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील पिडितांविषयी संवेदन व्यक्त केल्या आहेत. आपण मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके शक्य तितके प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.