भारतीय राजकारणाचे पितामह दादाभाई

Total Views |

इंग्रजांनी भारत देश लूट लूट लुटला. हे त्यांनी नेमके कसे केले? भारतीय व्यापार, उद्योग पद्धतशीरपणे मारून यांनी दरसाल इंग्लंडमध्ये किती संपत्ती पाठवली, हे इंग्लंडमध्ये राहून इंग्रज जनतेला सांगणारे पहिले भारतीय राजकारणी म्हणजे दादाभाई नवरोजी. दि. ४ सप्टेंबर हा दादाभाईंचा जन्मदिवस. येत्या दि. ४ सप्टेंबरला यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...


आपल्याकडे आडनाव लावणे किंवा न लावणे ऐच्छिक असावे, असे दिखते. जमशेटजी निजीभाई जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट, डॉ. भाऊ दाजी हे लोक आडनाव लावत नव्हते. असे का, याचे उत्तर मिळत नाही. पण, त्यांच्या समकालीनच असणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आडनाव लावताना दिसतात, असे का, हा अवश्य संशोधन करावे, असा हा विषय आहे.

तर आपण ज्यांना फक्त दादाभाई नवरोजी या नावाने ओळखतो, यांचे आडनाव ‘दोरदी’ होते. दोरदी घराणे मूळचे नवसारीचे. इतर असंख्य गुजराती आणि पारशी कुटुंबांप्रमाणेच नौरोजी पालनजी दोरदी आणि त्यांची पत्नी माणेकबाई हे नवसारीहून मुंबईला आले. नवरोजी पालनजी हे अग्यारीत धार्मिक कार्य करणारे धर्मगुरु होते.

माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा मूळ स्कॉटिश उमराव म्हणजे ब्रिटिशांना परमेश्वराने धाडलेली एक देणगी होती. ब्रिटिशांचे भारतातले सगळ्यांत अवघड शत्रू जे मराठे, त्यांचा पूर्ण मोड करून शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकावणे, हे दुर्घट कार्य एलफिन्स्टनने सन १८१८ साली पूर्णत्वाला नेले.

त्यानंतर अर्थातच तो तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर झाला. सन १८२७ साली संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनण्याचा प्रस्ताव त्याने स्वतःहून नाकारला आणि तो इंग्लंडला निघून गेला. हा एलफिन्स्टन बाबा मोठा विद्याप्रेमी होता. इंग्रजी राजवटीतील भारतीयांनी आधुनिक शिक्षण घ्यावे, असा त्याचा फार आग्रह होता. त्याचा हा आग्रह रास्त आहे, असे अनेकांना वाटत होते. १८२७ साली तो निवृत्त होऊन इंग्लंडला परतल्यावर या शहाण्या लोकांनी त्याचवर्षी ‘एलफिन्स्टन इन्स्टिट्यूशन’ या नावाची शाळा सुरू केली. त्यातूनच पुढे १८३५ साली एलफिन्स्टन कॉलेज सुरू झाले. हे कॉलेज ‘बॅचलर ऑफ आटर्स’ ही पदवी देत असे. दादाभाई नवरोजी दोरदी हा तरुण वयाच्या २०व्या वर्षी म्हणजे १८५० साली या एलफिन्स्टन कॉलेजमधून ‘बी.ए.’ होऊन बाहेर पडला. १८५० साली एलफिन्स्टन कॉलेजने दादाभाई नवरोजी या २५ वर्षांच्या तरुणाची गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांचा साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. एवढ्या लहान वयात हा बहुमान मिळवणारा तो पहिला भारतीय प्राध्यापक, पुढे १८५५ साली ते साहाय्यक प्राध्यापकाचे पूर्ण प्राध्यापक बनले.

शैक्षणिक क्षेत्रात अशी प्रगती करीत असतानाच दादाभाईंचे आपल्या पारशी धर्माकडेही लक्ष होते, असे दिसते. वडिलांप्रमाणे स्वतः दादाभाई हेसुद्धा पारशी धार्मिक कर्मकांड जाणणारे प्रशिक्षित पुरोहित होते. आपल्या पारशी धर्मकार्यात कालानुरूप सुधारणा व्हावी, म्हणून त्यांनी एक संस्था काढली आणि एक वृत्तपत्र सुरू केले.

भारतीय समाजपद्धती ही एकप्रकारे व्यक्तीप्रधान होती. एखादी जबरदस्त व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेने काहीतरी नवीन रचना करत असे. लोक ती मान्य करत असत. पण, ती व्यक्ती पडद्याआड गेली की, अनेकदा ती रचनाही बाजूला पडत असे. उलट पाश्चिमात्य समाजपद्धती ही संस्थात्मक आहे. संस्था या एक किंवा अनेक व्यक्तीच उभ्या करतात. पण, संस्थेला तिचे असे एक नियमबद्ध स्वरूप असते. त्यामुळे व्यक्ती बाजूला झाल्या, तरी संस्था आणि तिचे कार्य सुरूच राहते. इंग्रजांचे राज्यमंत्र ही अशीच एक संस्था होती. अव्वल इंग्रजी कालखंडात ज्या थोड्या लोकांनी इंग्रजांच्या यशाचे हे मर्म ओळखले, त्यात दादाभाई एक होते. १८५० ते १८५५ या काळात दादाभाई अशा रितीने संस्थात्मक कामात मग्न असतानाच यांच्या जीवनात एक नवे वळण आले.

१८५५ साली दादाभाई इंग्लंडला गेले. एका कापडाचा धंदा करणार्या कंपनीचे भागीदार म्हणून ते इंग्लंडमधील कामकाज पाहू लागले. तत्कालीन इंग्लंडमधील कपड्याची मोठी उतारपेठ म्हणजे लिव्हरपूल शहर. या शहरात कार्यालय थाटणे, ही मोठीच प्रतिष्ठेची बाब होती. लिव्हरपूल शहरात किंवा एकंदरीत इंग्लंडमध्ये स्वतःचे कार्यालय थाटणारी ‘कामा अॅण्ड कंपनी’ ही पहिली भारतीय व्यापारी संस्था होय. दादाभाई तिचेच भागीदार होते. पुढे १८५९ साली दादाभाईंनी इंग्लंडमध्ये स्वतःची ‘दादाभाई नवरोजी अॅण्ड कंपनी’ ही कॉटन ट्रेडिंग कंपनी काढली.

या मधल्या काळात १८५७ साली भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध राज्यक्रांती करण्याचा प्रयत्न झाला. पण, तो मोडून काढण्यात आला. दादाभाईंचा जन्म १८२५ सालचा. अमेरिकन राज्यक्रांती १७७६ सालची, तर फ्रेंच राज्यक्रांती १७८९ सालची. दादाभाईंनी या दोन्ही राज्यक्रांतींचा अभ्यास केलेला होता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या सूत्राने ते खूपच प्रभावित झाले होते. या पार्श्वभूमीवर भारताचे राज्यक्रांतीचे प्रयत्न अयशस्वी ठरलेले बघून दादाभाईंना काय वाटले?

दादाभाईंनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही. १८५९ साली त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची घडी पक्की बसवली. १८६१ साली त्यांनी लंडनमध्ये ‘द झोरास्ट्रियन ट्रस्ट’ ही संस्था काढून आपली धार्मिक जबाबदारी पार पाडली. मग १८६५ साली त्यांनी ‘लंडन इंडियन सोसायटी’ची स्थापना केली. भारतीय राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक विषयांची चर्चा करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. यातूनच पुढे १८६७ साली ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ ही संस्था निघाली.

इंग्रजांच्या सत्तेचे भौतिक सामर्थ्य, त्याचा नव्या पद्धतीचा राज्यकारभार, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतील नव्या शोधांमुळे शस्त्रास्त्रे, व्यापार, उत्पादन साधने इत्यादींमधली थारेपालटी बदल ते प्रत्यक्ष अनुभवत होते. पेशवाई किंवा अन्य भारतीय राजेरजवाडे यांचा राज्यकारभारही त्यांनी अनुभवला होता आणि आता १८५७ची क्रांती अयशस्वी झालेलीही ते पाहात होते. अशा स्थितीत या नव्या राजवटीचा फायदा आपल्या देशाला कसा करून घेता येईल, याचा विचार ते सतत करत होते, असे दिसते. याची पहिली पायरी म्हणून त्यांनी ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ किंवा ‘आयसीएस’च्या नोकर्या भारतीयांना खुल्या असाव्यात, अशी मागणी केली. १८६६ साली लंडनमधल्या एका वर्णद्वेषी संस्थेने ‘सर्व पौर्वात्य लोक हे वांशिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या पाश्चिमात्य लोकांपेक्षा हलक्या दर्जाचे आहेत,’ असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. दादाभाई आणि त्यांच्या मित्रांनी या प्रयत्नांचा सणसणीत समाचार घेतला. पण, ही फक्त सुरुवात होती.

१८७४ ते १८९१ या कालखंडात दादाभाई भारतात होते. त्याच काळात १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. याच काळात मुख्यतः दादाभाईंनी भारताच्या दारिद्—याचा सूक्ष्म अभ्यास केला. याचे आणखी एक कारण म्हणजे, १८७४ ते १८७६ या काळात वारंवार दुष्काळ पडला. भारताच्या आर्थिक अवनतीचे कारण इंग्रजांनी चालवलेली भारताची लूट हे आहे. भारतातून इंग्लंडकडे दरवर्षी संपत्तीचा प्रचंड ओघ जात असून, यामुळेच इंग्लंड संपन्न होत आहे. इतकेच नव्हे, तर भारताकडून मिळणार्या या पैशामुळेच इंग्लंडमधला औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली, असे दादाभाईंनी भरपूर अभ्यास करून प्रतिपादन केले. या अभ्यासामुळेच दादाभाईंना ‘भारताच्या आर्थिक राष्ट्रावादाचे जनक’ असे सार्थ बिरुद यांच्या समकालीन तमाम जहाल, मवाळ काँग्रेस नेत्यांनी तर दिलेच; पण नंतरच्या पिढीतल्या समाजवादी पंडित नेहरू आणि साम्यवादी रजनी पाम दत्त यांनीही ते मान्य केले.

१८९२ साली दादाभाई पुन्हा इंग्लंडला गेले आणि मजूर पक्षातर्फे निवडणूक लढवून चक्क ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय खासदार बनले. खासदारकीची शपथ यांनी बायबलवर हात ठेवून नव्हे, तर अवेस्तावर हात ठेवून घेतली. १८९२ ते १८९५ या आपल्या खासदारकीच्या काळात दादाभाईंनी पार्लमेंटमध्ये भारतीयांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी भाषणे केलीच, पण ‘आयरिश होम रुल’ या विषयावरही त्यांनी उत्कृष्ट भाषणे केली. १९०१ साली ‘पॉव्हर्टी अॅण्ड अन-ब्रिटिश रुल इन इंडिया’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि कमालीचे गाजले, वर्षाला किमान २०० ते ३०० कोटी रुपये (१९०१ सालचे) पौंड एवढी संपत्ती भारतातून इंग्लंडला जाते, असे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले. दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दादाभाईंच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. विनम्र अभिवादन.

भाई, साथी, कॉम्रेड

रशियात साम्यवादी क्रांती यशस्वी झाल्यावर सगळ्या रशियन नागरिकांनी एकमेकांचा उल्लेख करताना ‘मिस्टर अमूक’ असा न करता ‘कॉम्रेड अमूक’ असा करावा, असा आदेश देण्यात आला होता. ‘कॉम्रेड’ म्हणजे भाऊ. साम्यवादी व्यवस्थेत सगळे एकमेकांचे भाऊ आहेत, अशी भावना यातून निर्माण व्हावी, असे सोव्हिएत राज्यकर्त्यांना वाटत होते.

आपल्याकडच्या कम्युनिस्टांनी कॉम्रेडला पर्याय म्हणून ‘भाई’ हा शब्द प्रचारात आणला, तर समाजवाद्यांनी आपले वेगळेपण दाखवण्यासाठी ’साथी’ हा शब्द घेतला. भाई श्रीपाद अमृत डांगे, साथी मधू लिमये वगैरे मंडळी एकेकाळी भारतीय राजकारणात रुबाब फेकून होती. काही सामाजिक मंडळांनीही आपल्या सदस्यांचा उल्लेख ‘बंधू श्रीयुत अमुक’, ’भगिनी श्रीमती तमुक’ अशा शब्दांनी करायला सुरुवात केली होती. पण, आचार्य अत्र्यांनी एकदा त्यांची टिंगल ‘बं. भ. मंडळ’ (बंधू-भगिनी मंडळ) अशा शब्दांत केल्यावर त्यांचा उत्साह मावळला.

चीनमध्ये पण माओने क्रांती घडवून साम्यवादी सरकार आणल्यावर, नागरिकांनी एकमेकांना ’टोंगझी’ म्हणजेच ’कॉम्रेड’ म्हणून संबोधावे, असे आदेश निघाले होते. माओ हयात असेपर्यंत लोक एकमेकांना ‘टोंगझी’ म्हणत असत. पण, माओनंतर डेंग झियाओ पिंगच्या राजवटीत चीन वेगाने कॉर्पोरेट देश बनला. तसे हळूहळू ‘टोंगझी’ हे संबोधन मागे पडले आणि त्याजागी भांडवलशाही देशांप्रमाणेच ‘लाओबान’ आणि ’झियांगशेन’ ही संबोधने आली. ‘लाओबान’ म्हणजे ‘बॉस’ आणि ‘झियांगशेन’ म्हणजे ‘मिस्टर.’

आता चिनी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी एकमेकांना ‘टोंगझी’ म्हणूनच हाक मारावी. चिनी कम्युनिस्ट पक्षाला नागरिकांनी कॉर्पोरेट जीवनशैलीकडून पुन्हा साम्यवादाकडे जावे, असे वाटते. पक्षाने अलीकडे माओचे मूळ गाव आणि याच्या चळवळीतली अन्य गावे यांच्या सहली काढायला सुरुवात केली आहे. याला त्यांनी ‘लाल पर्यटन’ असे नाव दिले आहे. माओचे साम्यवादी गनिमी कार्यकर्ते जसे साध्या पोषाखात चिखलाने भरलेल्या वाटांवरून फिरत, तसे परभ्रमण पर्यटकांना मुद्दाम घडवले जात आहे.

पण आता चीनमध्ये पुन्हा आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्यांकडे मुबलक पैसा आहे. अन्य क्षेत्रांतल्या लोकांकडे तो तसा नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक म्हणतात, ‘आम्हाला महिन्याकाठी जेमतेम दोन हजार युआन मिळतात. आम्ही महिन्याला २० हजार युआन मिळवणार्या माणसाला ‘टोंगझी’ म्हणायचे हा ‘भाऊ’पणा नुसत्या शब्दांनी निर्माण होतो का?’

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.