नवी दिल्ली, छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवादाच्या हिंसेत उद्ध्वस्त झालेल्या पीडितांनी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. बस्तर शांतिसमितीच्या वतीने आयोजित या परिषदेत पीडितांनी सर्व खासदारांना आवाहन केले की, उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असलेले बी. सुदर्शन रेड्डी यांना त्यांनी नावाला पाठिंबा देऊ नये.
पीडितांनी आरोप केला की, न्या. सुदर्शन रेड्डी यांच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालामुळे आदिवासी जनतेच्या नक्षलविरोधी लढ्याला बंदी घालण्यात आली. सलवा जुडूम या चळवळीवर बंदी आल्याने नक्षलवाद्यांना बस्तरमध्ये पुन्हा जोर मिळाला आणि तो भाग आजवर न सुटणाऱ्या रक्तरंजित संघर्षाच्या गर्तेत ढकलला गेला. सलवा जुडूममुळे नक्षलवाद्यांची ताकद कमी झाली होती आणि ते शरणागतीच्या उंबरठ्यावर आले होते. परंतु दिल्लीतील काही नक्षल समर्थकांच्या दबावाखाली या चळवळीवर बंदी आणली गेली. हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्या वेदना, परिस्थिती आणि परिणामांची कोणालाही पर्वा नव्हती. आम्हाला कधीही विचारले गेले नाही की आम्हाला काय हवे आहे, असे पीडितांनी खेदपूर्वक नमूद केले.
बस्तर शांतिसमितीचे जयाराम यांनी सांगितले की, हे सर्व पीडित आज आपल्या वेदना घेऊन दिल्लीला आले आहेत. ज्यांनी बस्तर नरक बनवला, अशा व्यक्तीला खासदारांनी पाठिंबा देऊ नये, ही त्यांची विनंती आहे. तर समितीचे मंगऊराम कावडे यांनी स्पष्ट केले की, या मागणीसाठी खासदारांना स्वतंत्र पत्रेही पाठवली आहेत. बस्तरमधील हजारो कुटुंबांनी सलवा जुडूमवरील बंदीमुळे नरसंहारासारखे हाल सोसले. आज सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे जुन्या जखमांवरील खपली पुन्हा कोरली गेल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
पिडीतांना दु:ख अनावरपत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी सियाराम रामटेके यांनी आपल्या अंगावर आलेला भयावह प्रसंग कथन केला. त्यांनी सांगितले, नक्षलवाद्यांनी मला गोळ्या घातल्या, दगडांनी ठेचून मृत समजून टाकले. आज मी जिवंत असलो तरी कायमचा दिव्यांग आहे. जर रेड्डींनी तो निर्णय दिला नसता, तर माझे जीवन उद्ध्वस्त झाले नसते. त्यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची बातमी ऐकून मी संतप्त आणि व्यथित झालो. नक्षल हिंसेत प्राणार्पण केलेल्या मोहन उईके यांच्या पत्नीनेही सलवा जुडूमवर बंदी आल्यावरच माओवाद्यांनी माझ्या पतीवर हल्ला करून त्यांना ठार केले. त्या वेळी माझ्या हातात तीन महिन्यांची मुलगी होती. आज ती मुलगी १० वर्षांची झाली आहे; पण तिला कधीच वडिलांचे दर्शन घडले नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांची मुलगीही या पत्रकार परिषदेत उपस्थित होती.