नवी दिल्ली, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.
केंद्र सरकारच्या अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटकडून मान्यता मिळाल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
आयएमएफमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल संस्था चालविणाऱ्या मंडळाचा भाग असतील. या पदावरून ते दैनंदिन कामकाजावर देखरेख करतील आणि धोरणांची अंमलबजावणी करतील. भारतासह त्यांच्या गटातील इतर देशांचे प्रतिनिधित्व ते आयएमएफमध्ये करतील. सदस्य देशांच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेऊन त्यांचे विश्लेषण करणे, जागतिक व प्रादेशिक पातळीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करणे आणि आयएमएफकडून सदस्य देशांना दिल्या जाणाऱ्या कर्ज वा वित्तीय सहाय्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी असेल. त्याचबरोबर सदस्य देशांना आर्थिक धोरणे व वित्तीय व्यवस्थापनात तांत्रिक सहाय्य आणि क्षमतावृद्धी करण्याच्या कार्यक्रमांमध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावतील.
उर्जित पटेल यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आरबीआय गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ प्रत्यक्षात सप्टेंबर २०१९ पर्यंत होता, मात्र त्यांनी मुदतपूर्वीच पद सोडले. त्यानंतर ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (एनआयपीएफपी) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.