नवी दिल्ली, आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानासह १३ ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ही कारवाई दिल्लीतील रुग्णालय बांधकामातील घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली व आसपासच्या परिसरातील एकूण १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. रुग्णालय प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता आणि त्यातून झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ही तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या २४ जून रोजी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या प्रकरणाच्या चौकशीस मंजुरी दिली होती. भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार दाखल करून माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि सौरभ भारद्वाज यांच्यावर मिलीभगत करून आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, आम आदमी पार्टीने हे सर्व आरोप फेटाळले होते.
आरोपांनुसार, २०१८-१९ मध्ये ५५९० कोटी रुपयांच्या २४ रुग्णालय प्रकल्पांना (११ ग्रीनफील्ड आणि १३ ब्राउनफील्ड) मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचे सांगितले जाते. ६८०० खाट क्षमतेच्या ७ आयसीयू रुग्णालयांना सप्टेंबर २०२१ मध्ये ११२५ कोटी रुपये खर्च करून सहा महिन्यांत उभारण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ८०० कोटी रुपये खर्च करून केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे.
लोकनायक रुग्णालयाच्या नव्या ब्लॉकसाठी ४६५.५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, पण चार वर्षांत सुमारे ११२५ कोटी रुपये खर्च झाले, जे मूळ अंदाजाच्या जवळपास तीन पट जास्त आहे. तसेच १६८.५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पॉलीक्लिनिक प्रकल्पांतर्गत ९४ पॉलीक्लिनिक्स उभारायचे होते, परंतु ५२ पॉलीक्लिनिक्ससाठी तब्बल २२० कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. तसेच, हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम लागू करण्यात दशकभराहून अधिक काळाचा विलंब झाला असून, आर्थिक व्यवहारांमध्येही अनेक गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे. मंत्र्यांनी एनआयसीच्या ‘ई-हॉस्पिटल’ प्रणालीसारख्या किफायतशीर पर्यायांना वारंवार नाकारल्याचेही चौकशीत आढळले आहे.