नवी दिल्ली, भविष्यातील युद्धांमध्ये सीमांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरणार नाही. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी तात्काळ, ठाम आणि एकत्रित प्रतिसाद देणे अत्यावश्यक असल्याचे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले.
मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकरनगर येथील आर्मी वॉर कॉलेज येथे आयोजित ‘रण संवाद’ या तिन्ही सैन्यदलांच्या पहिल्या विशेष परिसंवादास सीडीएस जनरल चौहान यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि एकत्रित लॉजिस्टिक व्यवस्थेला भविष्यातील युद्धात विजयाचे मुख्य घटक ठरवले. त्यांनी सांगितले की “जॉइंटनेस” म्हणजेच सैन्यदलांमधील समन्वय ही भारताच्या सैनिकी परिवर्तनाची पायाभूत संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या सतत विकसित होणाऱ्या साधनांचा सैन्य प्रशिक्षणात व क्षमतेत समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सिव्हिल–मिलिटरी समन्वय अधिक सक्षम करण्यासाठी ‘सुदर्शन चक्र’ विकसित करण्याच्या बांधिलकीवर त्यांनी भर दिला. हे तंत्रज्ञान “ढाल आणि तलवार” दोन्हीची भूमिका पार पाडेल, असे ते म्हणाले.
कौटिल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून भारत विचारसंपदेचा आणि ज्ञानाचा उगमस्थान राहिला आहे. मात्र भारतीय युद्धशास्त्र किंवा रणनितीवर शास्त्रीय विश्लेषणाचे साहित्य फार कमी आहे. युद्ध, नेतृत्व, प्रेरणा, मनोबल आणि तंत्रज्ञान यांवर गंभीर संशोधनाची गरज आहे. भारत ‘सशक्त, सुरक्षित, आत्मनिर्भर आणि विकसित’ झाला पाहिजे. हे सर्व भागधारक एकत्र येऊन भविष्यवेधी सैन्यदल उभारतील तेव्हाच शक्य होईल, असे ते म्हणाले.
‘रण संवाद’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की प्रत्यक्ष युद्धातील अनुभव असलेले तरुण आणि मध्यम स्तरावरील अधिकारी तंत्रज्ञानातील बदलांविषयी सजग असतात. त्यांच्या मतांना ऐकून नवीन कल्पनांचा आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनाचा समन्वय घडवणारी परिसंवादाची पद्धत विकसित करणे आवश्यक आहे.