संघशताब्दीनिमित्त सरसंघचालकांची तीनदिवसीय व्याख्यानमाला - सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मांडणार १०० वर्षांची संघयात्रा आणि नव्या क्षितीजांवर करणार भाष्य

    25-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दिल्लीतील विज्ञान भवनात तीन दिवसीय व्याख्यानमालेस संबोधित करणार आहेत.

रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आज, २६ ऑगस्ट रोजी सरसंघचालक संघाचा १०० वर्षांचा प्रवास मांडणार असून या यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवांविषयी ते बोलतील. त्यानंतर उद्या, २७ ऑगस्ट रोजी संघ आणि स्वयंसेवकांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, अशा नव्या क्षितीजांवरही सरसंघचालक भाष्य करणार आहेत. व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी प्रश्नोतरे होणार असून सरसंघचालक यावेळी श्रोत्यांच्या लेखी प्रश्नांना उत्तरे देतील.

व्याख्यानमालेत सरसंघचालक पंचपरिवर्तन आणि समाजाचा सहभाग यावरही भाष्य करतील. सध्या देश विकासपथावर असून देशवासियांच्या अनेक आकांक्षा आहेत. त्यामध्ये संघ आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या योगदानावरही चर्चा होईल. भारताला नवीन क्षितिजांकडे पुढे जायचे असेल तर तो केवळ स्वतःच्या ताकदीने आणि शौर्याने पुढे जाऊ शकतो, यावर सरसंघचालक विशेष भर देणार आहेत. १०० वर्षांच्या प्रवासात, संघाने नेहमीच समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि संघाची विचारसरणी वेगळी नसून भारताच्या स्थापित परंपरेवर आधारित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. संघाची विचारसरणी सर्वांसह देशाला पुढे नेण्यात योगदान देण्याची आहे आणि विकासाच्या या प्रवासात संपूर्ण देशाने एकत्र पुढे जावे, असाही संदेश या व्याख्यानमालेतून देण्यात येणार आहे.

येथे होणार थेट प्रसारण

व्य़ाख्यानमालेचे थेट प्रसारण आरएसएसओआरजी (RSSOrg) नामक युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि एक्सवरून होणार आहे.