नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालयाने हास्यकलाकार समय रैना आणि इतर चार जणांना दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या असंवेदनशील टिप्पणीबाबत यूट्यूब तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी रैना आणि त्याचे सहकारी कलाकार — विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर ऊर्फ सोनाली आदित्य देसाई आणि निशांत जगदीश तंवर — यांनी न्यायालयात लिखित माफी सादर केली असल्याची माहिती देण्यात आली.
खंडपीठाने या कलाकारांना दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या सूचनेवर आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नाराजी व्यक्त करताना निरीक्षण नोंदवले की, आज दिव्यांगांवर विनोद केला जातो, उद्या इतर कुणावर होईल. याचा समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, याचिकाकर्त्या संस्थेच्या वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी न्यायालयास सांगितले की, या हास्यकलाकारांकडून दिव्यांगांच्या हितासाठी जागरूकता पसरवून समाजहिताचा उपयोग व्हावा. हे कलाकार प्रभावशाली आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून योग्य संदेश पोहोचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या सूचनेवर आता रैना आणि इतरांनी आपली प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे. मात्र, दंड किंवा खर्चाच्या बाबतीत निर्णय नंतर घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.