भारत-फिजी संबंधांना नवी गती; संरक्षण, आरोग्य, व्यापार आणि हवामान बदलावर करार

    25-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  फिजीचे पंतप्रधान सिटीवेनी राबुका हे सध्या भारत दौऱ्यावक आहेत. त्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, आरोग्य, हवामान बदल, कृषी, व्यापार आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण करार झाले.

या दौऱ्यात १०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुवा येथे उभारण्याचा करार झाला. तसेच औषध पुरवठा, ‘जन औषधी’ केंद्रे, ई-संजीवनी टेलिमेडिसिन आणि ‘हील इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत फिजी नागरिकांना भारतात उपचार मिळणार आहेत.

हवामान बदल व अक्षय ऊर्जेसाठी फिजीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा जाहीर झाला. भारताने फिजीला १२ कृषी ड्रोन, मृदा परीक्षण प्रयोगशाळा आणि उच्च दर्जाची बियाणे भेट दिली. संरक्षण क्षेत्रात भारत दोन रुग्णवाहिका, सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र आणि नौदल सहकार्य वाढवणार आहे. सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी हिंदी-संस्कृत शिक्षक नेमणूक, ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ व स्थलांतर-मोबिलिटी करार करण्यात आले. व्यापार क्षेत्रात फिजीने भारतीय तुपाला बाजारपेठ उघडण्याचा निर्णय घेतला असून ग्रामीण विकास, मानकीकरण आणि डिजिटल प्रशिक्षणासंबंधी पाच करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध लढा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सुधारणा आणि ग्लोबल साऊथ देशांच्या हितासाठी सहकार्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान राबुका यांनी भारताचे आभार मानत पंतप्रधान मोदींना फिजी भेटीचे निमंत्रण दिले.