नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीविषयीची माहिती उघड करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला आहे.
न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने दिल्ली विद्यापीठाने दाखल केलेल्या अपीलांना मान्यता देत २०१७ मधील सीआयसीचा आदेश रद्द केला. त्या आदेशात विद्यापीठाला माहितीचा अधिकार अर्जदाराला मोदींच्या पदवीसंबंधी माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. आरटीआय अर्जदाराने १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतील (बीए) अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी मागितल्या होत्या.
हा मुद्दा २०१६ मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींनी आपली शैक्षणिक पदवी सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती. मोदी यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात नमूद केले आहे की त्यांनी १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून राजनीति शास्त्र विषयात कला शाखेतील पदवी संपादन केली आहे.