भारत-चीन संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. चीनच्या आक्रमक विस्तारवादाला भारताने चोख उत्तर दिले आहे. मात्र, अमेरिकेच्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन भारताच्या जवळ येऊ पाहात आहे. जोवर सीमा शांत नाही, तोवर चर्चा शक्य नसल्याची भारताची भूमिका आहे. भारताने ही भूमिका स्पष्ट शब्दांत चीनला कळवलीही आहे.चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या अलीकडील भारत दौर्यानंतर काही सीमासंबंधी चर्चा, हवाई प्रवास व व्यापारासारख्या मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या घोषणांचा भपका वेगळा आणि वास्तव वेगळे आहे. कारण, भारत आता केवळ दिखाऊ आश्वासनांवर समाधानी राहणारा देश राहिला नाही. चीनला हे स्पष्टपणे समजले आहे की, भारताशी सीमावाद, आर्थिक व्यवहार आणि सामरिक स्पर्धा ही जुनी पद्धत आता चालणार नाही. आजचा भारत हा ठाम नेतृत्व असलेले, आक्रमकपणे आपले हित जपणारे राष्ट्र आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांची भाषाही आता बदलू लागली आहे.
डोकलामपासून गलवानपर्यंत चीनने भारताला दबावाखाली आणण्याचा जितका प्रयत्न केला, तितयाच ताकदीने भारताने प्रत्येक वेळेला त्याला प्रत्युत्तर दिले. गलवानमध्ये भारतीय जवानांचे शौर्य जगाने पाहिले. त्यानंतर भारताने घेतलेला सर्वांत मोठा निर्णय म्हणजे, चिनी कंपन्यांवरील निर्बंध. शेकडो मोबाईल अॅप्सवर बंदी, गुंतवणुकींवर निर्बंध आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा जोरदार धक्क्यामुळे, चीनला खर्या अर्थाने तोटा सोसावा लागला. चीनला सीमा आणि आर्थिक अशा दोन्ही आघाडीवर तोंड देण्याची धमक भारताने दाखवून दिली.
आज जागतिक पटलावर भारताची शक्ती अनेक पटींनी वाढली आहे. अमेरिका जेव्हा व्यापारयुद्धाच्या नावाखाली संपूर्ण जगावर व्यापारी दडपण आणते, तेव्हाही भारताने त्याला संतुलित उत्तर दिले आहे. अमेरिकेशी धोरणात्मक भागीदारी ठेवूनही, भारताने आपले स्वातंत्र्य गमावलेले नाही. चीनबरोबरचा आर्थिक तणाव, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटात भारताची भूमिका ही जगासाठी एक धडा आहे. पाश्चात्य देश रशियाविरुद्ध निर्बंध लावत असताना, भारताने स्वस्त दरात तेल खरेदी करून आपल्या जनतेला दिलासा दिला आणि देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवली. हे ‘राष्ट्रहित सर्वप्रथम’ या तत्त्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
चीनला अपेक्षा होती की भारत दबावाखाली येईल परंतु, घडले उलट. आज भारत ‘क्वाड’मध्ये अमेरिकेसोबत आहे, ‘ब्रिस’मध्ये रशियासोबत आहे आणि ‘जी २०’ द्वारे दक्षिणेचा नेता म्हणून उभा आहे. या सर्व आघाड्यांवर भारताने दाखवून दिले की, आम्ही कोणाच्याही दबावाखाली नाही. भारताचे परराष्ट्र धोरण आज बहुपक्षीय, संतुलित आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठाम राष्ट्रवादी आहे. युक्रेन-रशिया युद्धाच्या काळात पाश्चात्य देश रशियाबरोबरचा व्यापार थांबवण्यासाठी भारतावर दडपण आणत होते. पण, भारत त्या दबावाला झुकला नाही. उलट पाश्चात्य नेत्यांना तोंडावर सांगितले की, हा काळ युद्धाचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान केवळ एक संवाद नव्हता, तर ते भारताची नवीन भूमिका जगासमोर स्पष्ट करणारा घोष होता. युद्धविरामाची हाक, संवादाचे महत्त्व आणि स्वतःच्या हिताचे रक्षण हीच भारताची सध्याची ओळखे आहे.
भारत-चीन संबंधांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, आता स्थिती पूर्वीसारखी नाही. व्यापार वाढतो आहे, काही मुद्द्यांवर संवादही होतो आहे. पण दोन्ही देशातील मूलभूत विश्वासाचा अभाव कायम आहे. चीनच्या दुटप्पी धोरणांवर भारताने आता उघडपणे बोट ठेवले आहे. दक्षिण चीन समुद्र असो, इंडो-पॅसिफिक असो किंवा सीमावाद, भारताने आपले धोरण स्पष्टपणे मांडले आहे. चीनला हे आता लक्षात आले आहे की, भारत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. भारताची अर्थव्यवस्था आज जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने होत असलेला विकास, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, अंतराळ मोहिमा, सेमीकंडटर उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा यामध्ये भारत मोठ्या शक्तींना मागे टाकत आहे. चीनचे सर्वाधिक दुखणे हेच आहे की, आजचा भारत जागतिक गुंतवणुकीचा केंद्रबिंदू होत आहे. ‘अॅपल’पासून ‘टेस्ला’पर्यंत सर्व कंपन्या भारताकडे संधी म्हणून पाहत आहेत.
अमेरिकेचे व्यापारयुद्ध, रशिया-युक्रेन संघर्ष किंवा मध्य-पूर्वेतील अस्थिरता असो, भारताने प्रत्येक मुद्द्यावर आपला तोल सांभाळत राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे. इतर देश जिथे दबावाला बळी पडतात, तिथे भारत दबावाला उत्तर देतो. इतर देश जिथे आपली भूमिका बदलतात, तिथे भारत आपल्या भूमिकेला ठामपणे मांडतो.
आज भारत चीनला उघडपणे सांगतो की, सीमेवरील शांततेशिवाय सामान्य संबंध शय नाहीत. हीच खरी आक्रमक राष्ट्रवादाची भाषा आहे. चीनने हे लक्षात घेतले पाहिजे की, २०२५ सालचा भारत हा १९६२चा भारत नाही. आज आपल्याकडे बलवान सेना, जागतिक सहयोग, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि ठाम राजकीय नेतृत्व आहे. जग बदलत आहे. अमेरिकेने आपला दबदबा टिकवण्यासाठी व्यापारयुद्धाचा मार्ग स्वीकारला आहे, चीन आपला विस्तारवाद चालू ठेवत आहे, रशिया-युक्रेन युद्ध अजूनही धगधगत आहे. अशा अस्थिर काळात भारत हे स्थैर्याचे, संतुलनाचे आणि शक्तीचे केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहे. यामुळेच आज भारताकडे जग ‘समस्या सोडवणारा’ नेता म्हणून पाहत आहे.
भारत-चीन संबंधांचा पुढील मार्ग नेहमीच तणावपूर्ण राहील; पण आता त्या तणावाचे नियम भारत लिहीत आहे. पाकिस्तानला आपण शिक्वलेला धडा, चीनविरुद्ध घेतलेले निर्णय आणि जागतिक पटलावरचे आपले शक्तीवर्धन हे सर्व मिळून, भारताला २१व्या शतकातील खर्या महासत्ता बनवत आहेत. आजचा भारत कोणाच्याही दयेवर नाही, तर स्वतःच्या सामर्थ्यावर उभा आहे. हेच ‘ऑपरेशन सिंदूर’पासून गलवानपर्यंत, अॅप्सवरील बंदीपासून जागतिक मंचांवरील ठाम भूमिकेपर्यंत दिसून येते. म्हणूनच आता जगाला भारताचा स्पष्ट संदेश ऐकणे भाग आहे.