नवी दिल्ली, कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराला बदनाम करण्यामागे काँग्रेसचे टूलकिट आहे. खोटे पुरावे, बनावट छायाचित्रे आणि दबावाखाली घडवून आणलेल्या तक्रारींच्या माध्यमातून काँग्रेस हिंदू संस्थांची बदनामी करत आहे. हा संपूर्ण कट राहुल गांधींच्या निकटवर्तीयांच्या मार्गदर्शनाखाली रचला गेला असून कर्नाटक सरकार फक्त बाहुल्यासारखे वागत आहे, असा आरोप भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी शनिवारी केला आहे.
मालवीय यांनी थेट निशाणा साधत म्हटले की, एका मुखवटाधारी व्यक्तीच्या आधारावर काँग्रेस सरकारने एसआयटी स्थापन केली, १६ ठिकाणी खोदकाम केले आणि ‘स्मशानभूमी’ ठरवण्याचा भयंकर डाव रचला. मात्र, वास्तवात फक्त एका पुरुषाचा सांगाडा आणि आत्महत्या केलेल्या आणखी एका पुरुषाचे अवशेष सापडले. धक्कादायक बाब म्हणजे सुजाता भट नावाच्या महिलेवर दबाव आणून तिला काल्पनिक ‘अनन्या भट’ नावाच्या मुलीबाबत तक्रार दाखल करायला लावली. मात्र अखेर संबंधित महिलेनेच अशी कोणतीही मुलगी अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. वापरलेले छायाचित्र एआयचा वापर करून तयार करण्यात आले होते, असेही मालवीय यांनी म्हटले आहे.
मालवीय यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल करत सांगितले की, ८०० वर्षांची परंपरा लाभलेले धर्मस्थळ मंदिर हे समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि जातिभेदविरहित भोजन या उपक्रमांसाठी ओळखले जाते. ही संस्था इस्लामी प्रभावाला विरोध करते आणि किनारपट्टीवरील माफिया टोळ्यांनाही विरोध करतो. त्यामुळेच या हिंदूंच्या स्थळावर काँग्रेसने हल्ला केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हिंदू संस्थांना बदनाम करण्यासाठी ‘अल जझीरा’सारख्या माध्यमांना हाताशी धरले जात असल्याचा आरोप करत मालवीय म्हणाले की, कर्नाटकातील काही काँग्रेस मंत्रीही अस्वस्थ आहेत, पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीच्या आदेशाखाली काम करत आहेत, असेही मालवीय यांनी यावेळी नमूद केले आहे.