नवी दिल्ली, तमिळनाडू भाजपचे प्रवक्ते ए.एन.एस. प्रसाद यांनी शनिवारी तमिळगा व्हेट्री कळगम (टिव्हीके) प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्यावर जोरदार टीका केली. "विजय हा केवळ 'राजकीय अभिनेता' असून, त्याच्याकडे कोणतीही विचारधारा किंवा तत्त्वनिष्ठा नाही. तो केवळ निवडणूक फायद्यासाठी आणि मतपेढीच्या राजकारणासाठी काम करत आहे," असे प्रसाद यांनी म्हटले.
विजय यांच्या "मी महासागर आहे आणि सामान्य जनतेचा आवाज आहे" या विधानावरही प्रसाद यांनी जोरदार हल्लाबोल केला. "महासागराचे पाणी पिण्यायोग्य नसते. विजयने तिरुवल्लुवरांचे 'तिरुक्कुरल' आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. त्यानंतरच त्याचा 'महासागर' हा अहंकार शुद्ध होईल आणि त्याचे राजकारण लोकांसाठी उपयुक्त ठरेल," अशी टीका त्यांनी केली.
प्रसाद यांनी असा आरोप केला की विजय यांची राजकीय हालचाल ही केवळ सत्तेच्या राजकारणासाठी आणि मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नासाठी आहे. "त्याचे मदुराईतील भाषण हे राजकीय चर्चेपेक्षा एखादा चित्रपट पाहत असल्याचा अनुभव देणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'मिस्टर पीएम' आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना 'काका' म्हणणे हे तमिळनाडूच्या जनतेचा अपमान आहे. जनतेला असा अपमानकारक भाषणप्रकार कधीही मान्य होणार नाही," असे प्रसाद म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी विजय यांनी आपला पक्ष आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत, "भाजप आमचा वैचारिक शत्रू आहे, तर सत्तारूढ द्रमुक हा आमचा राजकीय शत्रू आहे," असे स्पष्ट केले होते.