नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी अमेरिकन खासदारांशी भेटी घेतल्या आहेत.
क्वात्रा यांनी सीनेटर बिल हेगर्टी यांची भेट घेऊन भारत-अमेरिका भागीदारीसाठी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्यांनी एक्सवर पोस्ट करून संतुलित, निष्पक्ष आणि परस्पर हितकारक व्यापारसंबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चांची माहिती दिली. तसेच भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत आणि हायड्रोकार्बन क्षेत्रातील वाढत्या व्यापारावरही त्यांनी दृष्टिकोन मांडला. याशिवाय क्वात्रा यांनी काँग्रेस सदस्य ग्रेग लँड्समॅन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय व्यापार संबंधांतील प्रगती, ऊर्जा सुरक्षा आणि भारत-अमेरिका यांच्यातील वाढत्या हायड्रोकार्बन भागीदारीबाबत माहिती देण्यात आली.
क्वात्रा यांनी याआधी हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे सदस्य व नॅशनल सिक्युरिटी एजन्सी आणि सायबर उपसमितीचे रँकिंग मेंबर जोश गोटेहाइमर यांची भेट घेतली होती. या भेटीत तेल व गॅस क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर लाभदायक व्यापार करारांबाबत सविस्तर चर्चा झाली.
९ ऑगस्टपासून आतापर्यंत क्वात्रा यांनी १६ अमेरिकन खासदारांशी चर्चा केली आहे. या भेटी अशा वेळी झाल्या आहेत, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यात २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरील २५ टक्के टॅरिफचाही समावेश आहे.
भारताने रशियन तेल खरेदीचे समर्थन करताना स्पष्ट केले आहे की, ऊर्जा खरेदी ही राष्ट्रीय हित आणि बाजाराच्या गरजांवर आधारित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध घातल्यामुळे भारताने सवलतीच्या दरात उपलब्ध होणारे रशियन तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती.