काँग्रेसमधील तरुण नेत्यांपासून राहुल गांधी भयभीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिप्पणी

    21-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  काँग्रेसमध्ये अनेक तरुण आणि प्रतिभाशाली नेते आहेत. मात्र, राहुल गांधी यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांना स्वतःची मते मांडण्याची किंवा पक्षात पुढे येण्याची संधी दिली जात नाही; अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेत्यांसोबतच्या चहापानादरम्यान केल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी रालोआ नेत्यांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसमधील तरुण नेते राहुल गांधींना असुरक्षिततेच्या भावनेत ढकलत आहेत. राहुल गांधींना स्वतःभोवती नवे आणि सक्षम नेतृत्व दिसत असल्यामुळे ते अस्वस्थ आणि घाबरलेले आहेत. पक्षातील खऱ्या क्षमतेला वाव देण्याऐवजी कुटुंबाचे वर्चस्व जपण्यासाठी दबाव आणला जातो. त्यामुळे काँग्रेसचे भविष्य अधिकच गडद बनले आहे. त्याचप्रमाणे नव्या नेत्यांना वाव मिळत नसल्यानेही तरुण नेते नाराज असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी – विरोधकांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले नाहीत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या कार्यशैलीवरही टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, संसद अधिवेशनादरम्यान काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी लोकशाहीची जबाबदारी निभावण्याऐवजी विधेयकांवर चर्चा टाळली. जनतेसाठी महत्त्वाचे कायदे पारित होणे आवश्यक असताना काँग्रेसने केवळ हंगामा केला. लोकसभेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केलेल्या महत्त्वाच्या विधेयकांच्या प्रती काँग्रेस खासदारांनी फाडून टाकल्याकडेही पंतप्रधानांही लक्ष वेधले.