इंदिरा गांधींची अनैतिक परंपरा कायम ठेवण्याचा काँग्रेसचा अजेंडा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात

    20-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली, तुरुंगातून सरकार चालविण्याच्या पद्धतीस आळा घालण्यासाठीच्या विधेयकास काँग्रेसचा विरोध म्हणजे इंदिरा गांधी यांची अनैतिक परंपरा पुढे चालवण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला आहे.

देशातील राजकीय भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ठाम आहे. सार्वजनिक जीवनात नैतिकता टिकवण्यासाठी व तुरुंगातून सरकार चालवण्याच्या विकृत परंपरेला आळा घालण्यासाठी आज लोकसभेत महत्त्वाचे संविधान (दुरुस्ती) विधेयक सादर करण्यात आले. लोकसभा अध्यक्षांच्या संमतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडले. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्र व राज्यातील मंत्री जर तुरुंगात गेले, तर ते कोणत्याही परिस्थितीत सरकार चालवू शकणार नाहीत, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे काँग्रेसवर घणाघात केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:लाही कायद्याच्या चौकटीत आणणारा घटनादुरुस्ती प्रस्ताव मांडला आहे. पण काँग्रेस आणि त्यांचे साथीदार मात्र कायद्यापेक्षा वर राहण्याची, तुरुंगातून सरकार चालवण्याची व सत्ता सोडण्यास नकार देण्याची परंपरा जपण्याचा आटापिटा करत आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 39व्या घटनादुरुस्तीमुळे पंतप्रधानांना विशेषाधिकार देत कायद्यापेक्षा वरचे स्थान दिले होते. “हीच काँग्रेसची संस्कृती – पंतप्रधानाला कायद्याबाहेर ठेवणे. तर दुसरीकडे भाजपची नीती स्पष्ट आहे – आमचे पंतप्रधान, मंत्री व मुख्यमंत्रीसुद्धा कायद्याच्या चौकटीत राहतील, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले.

काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या टिकेस प्रत्युत्तर देताना शाह यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने आपल्याला खोट्या प्रकरणात अटक केली होती. मात्र आपण अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. जामिनावर सुटल्यानंतर आपण पूर्णपणे निर्दोष ठरेपर्यंत कोणतेही पद स्वीकारले नाही. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, आपल्या खटला हा ‘राजकीय सूडबुद्धीने प्रेरित’ होता.

विरोधी पक्षांचा दुटप्पी चेहरा देश ओळखतो

इंदिरा गांधींनी सुरू केलेली अनैतिक परंपरा आजही काँग्रेस पुढे नेत आहे. लालू प्रसाद यादव यांना वाचवण्यासाठी काँग्रेसने अध्यादेश आणला होता. तेव्हा राहुल गांधींनी त्याचा विरोध केला होता. पण आज तेच राहुल गांधी पटण्यातील गांधी मैदानावर लालूंना गळाभेट देताना दिसतात. हा विरोधकांचा दुटप्पी चेहरा देशातील जनता ओळखते. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) सविस्तर चर्चेसाठी पाठवले जाणार होते. तरीदेखील, काँग्रेस व त्यांच्या इंडी आघाडीतील साथीदारांनी सभागृहात गोंधळ घालत विरोध केला. यामुळे त्यांचा बुरखा फाटल्याचे असे शहा यांनी ठणकावले.