नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत झालेला सिंधू जल करार हा देशासाठी अपायकारक ठरलेला असून त्यातून भारताला काहीही लाभ झाला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीच आपल्या सचिवामार्फत ही चूक मान्य केली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
नेहरूंनी देशाचे दोनदा विभाजन केले – पहिल्यांदा रेडक्लिफ रेषेच्या माध्यमातून आणि दुसऱ्यांदा सिंधू जल कराराद्वारे. या करारामुळे पाकिस्तानला तब्बल ८० टक्के पाणी देण्यात आले आणि भारताच्या शेतकऱ्यांच्या हिताला तडा गेला. त्यांनी पुढे सांगितले की, नंतर नेहरूंनी स्वतः मान्य केले की या करारातून भारताला काहीही फायदा झाला नाही. बैठकीत उपस्थित असलेले भाजप खासदार जगदंबिका पाल यांनीही यावर भाष्य करताना सांगितले की, नेहरूंनी संसदेला न विचारता हा करार करून देशाशी एकप्रकारे विश्वासघात केला. इतक्या मोठ्या निर्णयासाठी संसदेत मंजुरी घेणे आवश्यक होते, परंतु नेहरूंनी तो मार्ग अवलंबला नाही; याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
रालोआ संसदीय पक्षाच्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीपदासाठी रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा सत्कार केला. त्यावेळी उपस्थित खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना एकदिलाने राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून विरोधकांनीही या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला समर्थन द्यावे, अशी विनंती केली आहे. रिजिजू म्हणाले की, राधाकृष्णन यांची ओळख पंतप्रधानांनी सर्व खासदारांना करून दिली आणि त्यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान अधोरेखित केले. खासदारांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पंतप्रधानांचे आभार मानले.