नवी दिल्ली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) शताब्दी ही स्वयंसेवकांसाठी निश्चितच उत्साहवर्धक आहे. मात्र, हा काळ सिंहावलोकनासोबतच भविष्याचा वेध घेण्याचाही आहे; असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी केले होते.
रा. स्व. संघाचे दिल्ली प्रांताचे भुतपूर्व कार्यवाह रमेश प्रकाश यांच्या संघकार्याचा आढावा घेणारे ‘तन समर्पित, मन समर्पित’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, इंडिया टुडे समुहाच्या उपाध्यक्ष कली पुरी आणि रमेश प्रकाश यांच्या पत्नी आशा शर्मा उपस्थित होत्या.
रा. स्व. संघाने आपला १०० वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून यंदाच्या विजयादशमीपासून शताब्दी कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. हा प्रसंग सर्व स्वयंसेवकांसाठी निश्चितच आनंद आणि उत्साहाचा आहे. मात्र, त्यासोबतच संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचाही आढावा घेऊन सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. देश पारतंत्र्यात असताना १०० वर्षांपूर्वी प्रतिकूल काळात संघाचे काम सुरू झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळात दोनवेळा बंदी, वैचारिक विरोधकांकडून स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्या आदींच्या पार्श्वभूमीवरही संघाचे काम सुरूच आहे. त्यामागे रमेश प्रकाश यांच्यासारख्या अनेक स्वयंसेवकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शताब्दीचे औचित्य साधून स्वयंसेवकांनी आपल्या पूर्वसुरींच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्याचा वेध घेणे आवश्यक आहे, असे सरसंघचालकांनी म्हटले.
संघकार्य हे व्यक्ती जोडण्याचे काम असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आपलेपणा हा संघाचा स्वभाव असून तेच हिंदू समाजाचे मुलभूत तत्त्वही आहे. हिंदूंच्या आपलेपणास मर्यादा नसते, त्यातूनच ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार जन्माला आला आहे. संघाची शाखा एक तासाचीच असली तरी त्यामागे २३ तासांचे व्यक्ती जोडण्याचे काम प्रमुख असते. त्याचप्रमाणे देशातील मातृशक्तीलाही बरोबर घेऊनच संघाची वाटचाल सुरू आहे. रा. स्व. संघ आणि राष्ट्र सेविका समिती हे समांतर कार्य करत आहेत, असेही सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले आहे.
संघ ब्रिटीशांसाठी धोकादायक ठरू शकतो – इंग्रज गुप्तचर अहवाल
ब्रिटीशांना संघाचा धोका होता, हे कागदपत्रांमधून पुढे आल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते म्हणाले, डॉ. हेडगेवार यांनी १०० वर्षांपूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थिती संघाची स्थापना करून कार्य सुरू केले. त्यावेळी साधने नव्हती आणि संपत्तीही नव्हती, तरीदेखील त्यांनी एकट्यानेच वाटचाल सुरू केली होती. हेडगेवार हे क्रांतिकारकही होते, त्यामुळे इंग्रजांचा ससेमिराही असे. त्या काळात विदर्भ आणि खानदेशामध्ये संघाच्या शाखा सुरू झाल्या होत्या, या शाखांवर इंग्रज गुप्तहेरांचे बारिक लश्र असे. साधारणपणे १९४२ आणि त्यापुढील काळात इंग्रजांनी संघाच्या शाखा, शाखेत येणारे स्वयंसेवक, त्यांची नावे, पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांची संख्या, शाखेत होणारे कार्यक्रम अशी माहिती इंग्रजांनी गोळा केली होती. एवढेच नव्हे तर “आता जरी हे लोक निरुपद्रवी वाटत असले तरीदेखील भविष्यात ब्रिटीशांविरोधात काही सुरू झाल्यास हे लोक आपल्यासाठी डोकेदुखी ठरतील” असा शेरा जवळपास प्रत्येक कलेक्टरने अहवालात लिहीला होता, अशी माहिती सरसंघचालकांनी दिली.